Join us

मढमध्ये प्रार्थना नौका बुडाली, चार खलाशी वाचले, एक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चक्रीवादळाचा तडाखा साेमवारी मढ कोळीवाड्याला बसला. आज मालाड पश्चिम मढ बंदरात नांगरून ठेवलेली जिजा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चक्रीवादळाचा तडाखा साेमवारी मढ कोळीवाड्याला बसला. आज मालाड पश्चिम मढ बंदरात नांगरून ठेवलेली जिजा अशोक जांभळे यांची प्रार्थना मासेमारी नौका नं. आयएनडी-एमएच-२-एमएम -२५३४ ही बुडाली. यामध्ये पाच खलाशांपैकी चार सुखरूप वाचले, तर एक खलाशी बेपत्ता आहे. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

मध्यरात्री १२ ते साेमवारी पहाटे २.३० च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, नांगरून ठेवलेल्या २५ ते ३० मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले. त्यामुळे नौका एकमेकांवर आदळून मढ तळपशा बंदरात धनगर कोळी यांची व राहुल देवचंद्र कोळी यांची नौका एकमेकांवर आदळली. मढ कोळीवाडा, तुर्भे, माहूल, खारदांडा येथेही मासेमारी नौका बुडाल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.

शासनाकडून अपघातग्रस्त मच्छिमारांना आर्थिक मदत करावी. तसेच राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून पूर्ण निकामी झालेल्या नौकाधारकास १० लाखांची, जास्त प्रमाणात नुकसान झालेल्या नौकाधारकास ५ लाखांची व किरकोळ नुकसान झालेल्या नौकाधारकांना १ लाखाची आर्थिक मदत करावी. तसेच मृत मच्छिमारांच्या कुटुंबाला १० लाखांची अर्थिक मदत करावी. तेवढीच मदत केंद्र सरकारकडून मिळण्यास शिफारस करावी, अशी मागणी किरण कोळी यांनी केली.

------ -------------------------------------