Join us  

महापालिका बंगल्याचा वाद प्रवीण दराडे यांना भोवला?; अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 2:12 AM

मात्र, २० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झाल्यामुळे शिवसेनेला बंगल्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले होते

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी समजले जाणारे प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून वर्षभरातच बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेवर येताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात दराडे यांचाही समावेश होता. मात्र त्यांच्या बदलीमागे महापालिका बंगल्यांच्या वादाचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

मलबार हिल येथे महापालिकेचे दोन बंगले आहेत. त्यापैकी एका बंगल्यात पालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील सचिव प्रवीण दराडे वास्तव्य करीत होते. मात्र, दादर येथील शिवाजी पार्कवरील महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली. त्यामुळे तेव्हाचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मलबार हिल येथील जलविभागाचा बंगला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती.

पल्लवी दराडे यांची महापालिकेतून बदली झाल्यानंतर बंगला खाली करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या. यासाठी पत्रव्यवहार, नोटीसदेखील बजावण्यात आल्या. मात्र, दराडे हे पालिकेच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांना हा बंगला दिला आहे. ते या सेवेत असेपर्यंत त्यांच्याकडून बंगला काढू नये; तसेच बंगल्याच्या भाड्यासाठी दुप्पट रक्कम आकारू नये, असे निर्देश भाजप सरकारने दिले होते. हा मुद्दा शिवसेनेने प्रतिष्ठेचा करीत बंगला परत मिळविण्यासाठी जोर लावला होता.

मात्र, २० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झाल्यामुळे शिवसेनेला बंगल्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले होते. सध्या महाविकास आघाडी सरकारने सर्व सनदी अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा धडाका लावला आहे. प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेतून पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे; तर पल्लवी दराडे या अन्न व औषधे प्रशासन आयुक्त आहेत. त्यामुळे जलविभागाचा बंगला रिकामा होण्याचा मार्ग मोकळा झाला.

टॅग्स :शिवसेना