Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावीतील अपात्र झोपडीधारकांचा प्रताप

By admin | Updated: December 7, 2015 01:27 IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर ५मधील ‘क्लस्टर जे’मधील रहिवाशांची पात्र-अपात्रतेची प्रारूप यादी म्हाडाने जाहीर केली आहे.

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर ५मधील ‘क्लस्टर जे’मधील रहिवाशांची पात्र-अपात्रतेची प्रारूप यादी म्हाडाने जाहीर केली आहे. या यादीनंतर अपात्र ठरविलेल्या चार झोपडपट्टीवासीयांनी आपल्या खोल्यांची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आपल्या हक्कासाठी घर खरेदीदार म्हाडा कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु नियमानुसार ते अपात्र ठरत असल्याची उत्तरे म्हाडाकडून मिळत असल्याने या खरेदीदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.धारावीच्या सेक्टर ५चा पुनर्विकास करण्याची जबाबदारी शासनाने म्हाडावर सोपविली आहे. त्यानुसार म्हाडाने या प्रकल्पाची पथदर्शी इमारत उभारून येथील ‘क्लस्टर जे’मधील रहिवाशांची प्रारूप यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक जण अपात्र ठरले आहेत. या रहिवाशांना आपल्या हरकती नोंदविण्याची मुदत ३0 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार अपात्र झोपडीधारकांनी आपल्या हरकती म्हाडाकडे नोंदविल्या आहेत.म्हाडाने प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर यामध्ये अपात्र ठरलेल्या चार झोपडीधारकांनी आपल्या खोल्यांची विक्री केली आहे. प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर त्यामधील अपात्र रहिवाशांना हरकती नोंदविण्यास म्हाडाने मुदत दिली होती. परंतु या कालावधीत झोपडी खरेदी करणाऱ्या रहिवाशांनी म्हाडाकडे संपर्क साधला नाही. मुदतीनंतर खरेदीदारांनी म्हाडाकडे आपल्या रूमच्या ताब्याविषयी चौकशी केली. परंतु त्यांची कागदपत्रे पाहिल्यानंतर म्हाडा अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या झोपड्या अपात्र ठरविल्याचे सांगितले.झोपडीच्या पात्रतेसाठी शासनाच्या नियमानुसार ती २000पूर्वीची असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित झोपडी पात्र-अपात्रतेची प्रक्रिया सुरू होण्याच्या एक वर्षापूर्वी खरेदी केल्यास खरेदीदार पात्र होतो. अन्यथा त्याला अपात्र ठरविण्यात येते. या नियमानुसार हे झोपड्यांचे खरेदीदार अपात्र ठरले आहेत. खोलीचा ताबा मागण्यासाठी आलेल्या खरेदीदारांना म्हाडा अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताच या नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.या रहिवाशांनी सुमारे एक झोपडी २0 लाख रुपयांना खरेदी केली आहे. त्यामुळे एवढी मोठी गुंतवणूक करणारे हे खरेदीदार म्हाडा कार्यालयात चकरा मारत असून, पात्रतेसाठी अधिकाऱ्यांना विनवण्या करीत आहेत. (प्रतिनिधी)