Join us

प्रशांत ठाकूर विजयी

By admin | Updated: October 20, 2014 03:28 IST

विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे प्रशांत ठाकूर यांनी १३२१५ मतांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला

पनवेल : विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे प्रशांत ठाकूर यांनी १३२१५ मतांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. इतर पक्ष व उमेदवारांना पाहिजे तितका प्रभाव पाडता आला नाही. ही लढाई ठाकूरविरुद्ध पाटील अशीच झाली. त्यात ठाकूरांची सरशी झाली. मात्र शेकापच्या बाळाराम पाटील यांनी ठाकूर यांना कडवी झुंज दिली. रविवारी सकाळी ८ वाजता कळसेकर कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी भारतीय जनता पक्ष व शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हातात पक्षाचे झेंडे घेऊन ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत होते. सुरुवातीला पनवेल ग्रामीणच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या तीन फेऱ्यांत बाळाराम पाटील यांनी २३०० मतांची आघाडी घेतली आणि शेकापमध्ये उत्साह संचारला. १७ व्या फेरीपर्यंत शेकाप उमेदवाराने मताधिक्य घेतल्याने लालबावटा कर्नाळ्याच्या दिशेने जोमाने फडकत होता. मात्र त्यानंतर खारघर वसाहतीतील मतमोजणीला प्रारंभ झाला. या ठिकाणी ठाकूर यांना चांगली मते मिळाल्याने पाटील यांचे मताधिक्य कमी झाले. कामोठेकरांनी भाजपला साथ दिल्याने शेकापची मतांची आघाडी कमी होत गेली. नवीन पनवेल व पनवेलमध्ये मात्र भाजपचे मताधिक्य वाढत गेले. ठाकूर हे दहा हजाराच्या फरकाने पुढे असल्याचे पाहून बाळाराम पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडले. त्यावेळीच पनवेलमध्ये कमळ फुलणार हे निश्चित झाले होते. १८ व्या फेरीपासून भाजपच्या गोटातील चिंता शेकापच्या कळपात घुसली आणि शेवटच्या फेरीपर्यंत तिथेच राहिली. (प्रतिनिधी)