मुंबई : प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी आपल्या कुंचल्यातून किमया साधत देशाचे राष्ट्रपती ‘प्रणव मुखर्जी’ यांचे चित्र साकारले आहे. भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महोयदयांपासून अशी चित्रे काढून घेण्याची प्रथा असल्यामुळे त्या परंपरेतून हे चित्र प्रत्यक्षात आले. हे चित्र राष्ट्रपती भवनाच्या आवारात दिमाखात लावण्यात आले आहे.एका उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चित्रकार वासुदेव कामत यांची निवड या कलाकृतीसाठी करण्यात आली. या समितीत दिल्लीच्या ललित कला अकादमीचे अध्यक्ष, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, राष्ट्रीय कलाकुसर संग्रहालयाचे अध्यक्ष, मॉडर्न आर्ट आॅफ नॅशनल गॅलरीचे संचालक, राष्ट्रपतींचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.चित्रकार वासुदेव कामत यांना चित्रकलेचा छंद होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. या संस्थेतून प्रथम श्रेणीची पदवीही प्राप्त केली. कामत यांना तैलरंग आणि जलरंग यामध्ये काम करायला आवडते. मात्र तरीही त्यांनी सॉफ्टपेस्टल, आॅइलपेस्टल आणि अॅक्रॅलिक्समध्येही बरेच काम केले आहे. ‘पोर्ट्रेट्स’ या विषयात त्यांची हुकूमत वाखणण्याजोगी असून, त्यासाठी त्यांना अनेक सन्मानाने गौरविण्यात आले आहे. ‘माय वाइफ’ या पोर्ट्रेट्साठी त्यांना २००६ साली ‘द पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिका’ या संस्थेचा ड्रेपर ग्रॅण्ड पुरस्कार मिळाला आहे. आता राष्ट्रपतींचे चित्र रेखाटून कामत यांनी आणखी एक बहुमान प्राप्त केला आहे. (प्रतिनिधी)
कुंचल्यातून रेखाटले ‘प्रणवदा’!
By admin | Updated: October 10, 2014 02:34 IST