Join us  

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून महापालिकेच्या कार्याचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 1:22 AM

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासूनच कंबर कसली होती.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र गेले तीन महिने अविरत लढा देत महापालिकेने अखेर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणला आहे. पालिका प्रशासनाच्या या कार्याचे कौतुक महिंद्रा समूहाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. मात्र मधल्या काळात रुग्णांची संख्या वाढत गेल्याने चिंता वाटत होती. परंतु, पालिका प्रशासनाने थोड्याच अवधीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे महापालिकेचे डॅशबोर्ड आज अन्य शहरांपुढे आदर्श असल्याचे आनंद महिंद्रा यांनी टिष्ट्वट केले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळवून देणे आणि त्यांच्यावर चांगले उपचार करणे यावर पालिकेने भर दिला आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सध्या मुंबईतील परिस्थितीत खूप सुधारणा झाली आहे. मात्र सामूहिक संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागात अतिरिक्त खाटा आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी टिष्ट्वटद्वारे व्यक्त केले आहे.

टॅग्स :आनंद महिंद्रामुंबई महानगरपालिका