Join us  

Prabhakar Sail: स्वत: चालत गेले, ECG काढला अन्...; प्रभाकर साईलच्या पत्नीनं सांगितला संपूर्ण घटनाक्रम! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 2:52 PM

प्रभाकर साईल यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी सांगितलं.

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत सापडला होता. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. परंतू या कारवाईवर नंतर मोठे खुलासे झाले होते. वानखेडेंनी खंडणी उकळल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात प्रभाकर साईल (Prabhakar Sail) पंच होता. त्याचा आज मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. 

शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे प्रभाकर साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

आर्यन खान प्रकरणात एनसीबीने परवाच कोर्टाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदत मागितली होती मात्र कोर्टाने ६० दिवसात चार्जशीट दाखल करा असे आदेश दिले होते आणि आज मुख्य साक्षीदाराचा मृत्यू झाल्याने विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र प्रभाकर साईल यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी सांगितलं.

पूजा यांनी सांगितलं की, ते स्वत: चालत गेले. त्यांचा ECG काढला गेला. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मग ते चंद्रा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. त्यांना नंतर अटॅक आला आणि पाच मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला तिथलं सीसीटीव्हीही दाखवला. त्यात सर्व दिसत आहे. आम्हाला काहीही शंका नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, असं पूजा साईल म्हणाल्या.

दरम्यान, आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. गोसावीचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.  साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडणी मागितली होती असा आरोप साईल याने केला होता. 

राष्ट्रवादीने केला घातपाताची शक्यता-

प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे की, कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोआर्यन खानसमीर वानखेडे