डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महापौरांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यास मंजूरी न दिल्यास मनसे सदस्यांनी सभागृहातच ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.त्या संदर्भातील आदेश पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांनी गटनेत्यांसह सर्वांना दिल्याचे सांगण्यात आले. दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही स्थायीकडून पुढे गेलेल्या अर्थसंकल्पावर निर्णय होऊ शकत नाही, त्याबाबत महापौरांना काहीही वाटत नाही हे योग्य नसल्याची टिकाही सदस्यांकडून होते आहे. तसेच याच महासभेत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या बांधकामांना अंतरीम मनाई आदेशासंदर्भातही आयुक्तांना जाब विचारण्यात येणार असून आक्रमकपणे ही भूमिका करण्यात येइल असेही स्पष्ट करण्यात आले. आधारवाडी डम्पिग ग्राऊंडची समस्या ही वर्षानूवर्षे तशीच राहील्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. महासभेने वेळोवेळी या समस्येबाबत गांभिर्याने चर्चा केली असतांनाही प्रशासन याकडे लक्ष का देत नाही? कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना दिलासा देणारे निर्णय-चर्चा न झाल्यास सभागृहात आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पाच्या मंजूरीवरुन तणातणी!
By admin | Updated: April 18, 2015 23:12 IST