Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:06 IST

तोडगा निघेना; कंपनीच्या व्हाॅट‌्सॲप ग्रुपमधून पडणार बाहेरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना महामारीच्या काळात नवीन टीपीए नेमल्यामुळे वीज ...

तोडगा निघेना; कंपनीच्या व्हाॅट‌्सॲप ग्रुपमधून पडणार बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात नवीन टीपीए नेमल्यामुळे वीज कामगार, अभियंते, अधिकारी यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याविराेधात २४ मेपासून वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीमध्ये सहभागी सहा संघटनांनी पुकारलेले कामबंद आंदोलन शुक्रवारीही सुरू होते. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवाय यंत्रणा काही केल्या काहीच उत्तर देत नसल्याने आता निषेधाचा आणखी एक पर्याय म्हणून वीज कर्मचारी कंपनीच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत.

प्रशासन व शासन तोडगा काढण्यात असमर्थ दिसत असल्याने नाइलाजास्तव आंदोलनाची पुढची प्रक्रिया म्हणून आजपासून कंपनीच्या सर्व व्हाॅट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडून आंदोलन स्थगित होईपर्यंत निषेध व्यक्त करायचा आहे, अशा सूचना वीज कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीने मेडिक्लेम पाॕॅलिसीत २०२० पासून परस्पर ऊर्जा विभागाकडून टीपीए नेमणे, मेडिक्लेम पाॕॅलिसीस २०२१ साठी सुरुवातीला कामगार संघटनांना विश्वासात न घेता ३ महिनेच मुदतवाढ देणे, असा हस्तक्षेप सुरू केला आहे. कोविड झाल्याने हजारो कामगार, अभियंते व कंत्राटी कामगार विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना प्राधान्य देत लसीकरण न केल्यामुळे शेकडो कामगारांचा मृत्यू झाला, हजारो कामगार व कुटुंबीय बाधित झाले, असा समितीचा आराेप आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यापूर्वी बोलाविलेल्या ऑनलाइन बैठकीत समितीने विविध मुद्द्यांबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र यावेळी कोणत्याच मुद्द्यावर तोडगा निघाला नाही. परिणामी राज्यभरात पुकारण्यात आलेले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीने दिली.