Join us  

सत्तेत कायम; पण स्वबळावर लढणार- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:18 AM

मुंबई : सरकारमधून बाहेर पडायचे की नाही, हे मला शिकवू नका, असा टोला टीकाकारांना लगावतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. शिवसेनेच्या ५२व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. जम्मू काश्मीरचे सरकार नालायक असल्याचे कळायला तीन वर्षे लागली. ६०० जवान मारले गेल्यावर शहाणपण सुचले, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली.भाजपाच्या बाकी गोष्टी पटत नसल्या, तरी सरकारचा पाठिंबा काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगून ते म्हणाले की, आता पाकिस्तानला चिरडून टाका, अशी भूमिका घेतली, तर तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ, रमजानमध्ये शस्त्रसंधी लागू केल्याने दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या. दहशतवाद्यांना धर्म नसेल, तर रमजानच्या वेळीच शस्त्रसंधी का केली? गणेशोत्सव काळात सरकार कधी शस्त्रसंधी करते का? चार वर्षे मोदी सरकार सत्तेत आहे. मात्र, अजूनही काश्मीरमध्ये एक इंच जमीन हिंदूंना मिळाली नाही, असा आरोपही त्यांनी केला.महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणा करून ते म्हणाले की, सत्तेच्या लालसेसाठी मला भगवा फडकवायचा नाही. लोकांसाठी सत्ता हवी आहे. लोकसभा व विधानसभेवर भगवा फडकविण्याआधी लोकांच्या मनात तो रुजवा आणि त्यांचा पाठिंबा मिळवा.पगड्यांमुळे लोक प्रसिद्ध झाले नाहीत, तर त्या लोकांमुळे पगड्या प्रसिद्ध झाल्या. लोकमान्य टिळकांची पगडी चालत नाही, पण इफ्तार पार्टीची टोपी चालते, या शब्दांत शरद पवारांना टोला लगावत, समविचारी पक्षांची आघाडी करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर समविचारी कोण, असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले की, अमित शाह, पवार यांच्याकडून आघाडीची निमंत्रणे येणे, हा शिवसेनेच्या ताकदीचा परिणाम आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांच्या घरावर तबकड्या उडत असल्याच्या बातम्या आल्या. सर्व देश फिरून आता ते परग्रहावर दौरा करतील. परग्रहावरही ते थापाच मारतील, अशी खिल्ली उद्धव यांनी उडविली.>मुंबईला हात लावू नकामुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा महामार्गाला विरोध करताना मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. वेगवेगळ्या प्रकल्पांनी मुंबईला गुजरातचे उपनगर करण्याचा प्रयत्न केलात, तर त्याला शिवसेना कडाडून विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला. नाणार प्रकल्प कोकणात उभारण्यास विरोध असेल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

टॅग्स :उद्धव ठाकरे