भिवंडी : यंत्रमाग व कापड व्यवसायातील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय यंत्रमाग बंद करण्याची घोषणा राज्यस्तरीय यंत्रमाग समन्वय समितीने भिवंडीत झालेल्या सभेत केली. मात्र, यंत्रमागधारकांनी या सभेत वीजदरवाढीस प्रामुख्याने लक्ष्य बनविले आहे.शहरातील स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये काल शनिवारी दुपारी राज्यस्तरीय यंत्रमागधारकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मालेगाव, इचलकरंजी, विटा, धुळे, सोलापूर, उल्हासनगर, येवला येथील यंत्रमाग समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भिवंडीतील यंत्रमाग मालक व चालकांचा समावेश होता. या वेळी यंत्रमाग क्षेत्रातील समस्या पदाधिकाऱ्यांनी मांडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २ फेब्रुवारी १५ रोजी राज्यात लाक्षणिक यंत्रमाग बंद करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवशी सरकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे. तसेच वीजदर वाढविल्याने वीजबिलांची होळी करण्यात येणार आहे.या प्रसंगी यंत्रमागधारक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती अध्यक्ष प्रतापराव होगाडे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, पेडीक्सीलचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम वंगा, मालेगावचे आमदार आसीफ रशीद, आ. रूपेश म्हात्रे,उपस्थित होते.
राज्यातील यंत्रमाग २ फेब्रुवारीला बंद
By admin | Updated: January 26, 2015 00:48 IST