Join us

महानगरपालिकेतर्फे कचर्‍यावर वीजनिर्मिती

By admin | Updated: May 20, 2014 01:56 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेची आज महासभा पार पडली. या महासभेत हद्दीतील विकासकामांवर चर्चा झाली.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची आज महासभा पार पडली. या महासभेत हद्दीतील विकासकामांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन व डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न यांचा समावेश होता. ठेकेदारांना कचरा विल्हेवाटीचे काम परवडत नसल्यामुळे आता पालिका प्रशासन कचर्‍यावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प राबवणार आहे. तसेच हद्दीतील स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावायचा प्रस्ताव चर्चेस आला होता, परंतु आधी स्मशानभूमीमधील विविध नागरी समस्या सोडवा व मग सीसीटीव्ही कॅमेरे लावा असा सूर एका नगरसेवकाने लावला. परंतु हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सकाळी ११ वा. महासभेला सुरूवात झाल्यानंतर महापौर नारायण मानकर यांनी तालुक्यातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली विषय चर्चेला घेतला व अनेक नगरसेवकांनी शोकप्रस्ताव मांडले. शोकप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या खा. अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचे सभागृहातर्फे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर गोखिवरे येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याकरिता नियुक्त करण्यात आलेला ठेकेदार काम सोडून गेल्याबाबत सविस्तर विवेचन केले व त्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. ठेकेदारांना सदर काम परवडत नसल्यामुळे आता वीजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचे पालिका प्रशासनाने ठरवल्याचे महापौर मानकर यांनी सभागृहाला सांगितले. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या या महासभेत निवडणुकीतील निकालाचे पडसाद उमटल्याचे दिसत होते. पूर्वीसारखा सत्ताधारी नगरसेवकांमध्ये उत्साह दिसून येत नव्हता. (प्रतिनिधी)