Join us

भाजपाच्या अपयशामुळे सत्ता हुकली - शिवसेना

By admin | Updated: May 7, 2015 00:34 IST

भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नसल्यामुळे आपणास सत्ता मिळाली नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून शिवसेना नेत्यांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले.

नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. परंतु भारतीय जनता पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नसल्यामुळे आपणास सत्ता मिळाली नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून शिवसेना नेत्यांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले.शिवसेनेने महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या ३८ नगरसेवकांचा नेरूळमधील आगरी कोळी भवनात सत्कार केला. ‘जनतेने राष्ट्रवादीला नाकारले आहे. सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही त्यांच्या पक्षाला महापौर व उपमहापौरपदही मिळालेले नाही. निवडणुकीमध्ये भाजपाचे थोडे जास्त नगरसेवक निवडून आले असते तर आपली सत्ता असती, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. उपनेते विजय नाहटा यांनीही पराभवाचे खापर भाजपावर फोडले. ‘शिवसेनेने चांगले काम केले. आपल्याला पूर्वीपेक्षा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. परंतु भाजपाला कमी जागा मिळाल्या. आपल्या जोडीदाराच्या कमी जागा निवडून आल्यामुळेच आपल्याला सत्तेपासून वंचित राहावे लागले,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण त्यांना दोष देत नाही. यापुढेही त्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करू. परंतु त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरीचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यांना जनतेने त्यांची जागा दाखविली आहे. बंडखोरांना पुन्हा स्थान दिले जाणार नाही. काहींनी निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीशी साटेलोटे केले होते. काहींना १०० मतेही मिळविला आली नाहीत. यापुढे पक्षाची पुनर्बांधणी करण्यावर लक्ष देण्यात येणार आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल. निष्ठावंतांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार राजन विचारे यांनी ‘महापालिकेत कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही,’ हे स्पष्ट केले. माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनीही बंडखोरांना क्षमा केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पराभवाचे खापर भाजपावर न फोडता यापुढेही त्यांना बरोबर घेऊन काम करू, असे स्पष्ट केले. यावेळी विठ्ठल मोरे, मनोहर गायखे, सरोजताई पाटील, नामदेव भगत, रंजना शिंत्रे, विजय माने, एम. के. मढवी, संजू वाडे व इतर नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ निवडणुकीनंतरच्या शिवसेनेच्या पहिल्याच मेळाव्याकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली होती. अनेक महत्त्वाचे पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. हॉल मोकळा असल्यामुळे कार्यक्रम जवळपास एक तास उशिरा सुरू करण्यात आला. फोन करून कार्यकर्त्यांना बोलावले जात होते. ४०० आसनक्षमतेचा हॉल भरण्यासाठीही शिवसेनेला धावपळ करावी लागली. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्याला १० नगरसेवकही आले नाहीत. यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांचाही समावेश आहे. नाईकांचे संतुलन ढासळले!पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीसह नाईक पिता - पुत्रांवर जोरदार टीका केली. मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केले. सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही त्यांच्या पक्षाचा महापौर व उपमहापौर होऊ शकला नाही. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आम्ही त्यांचे नगरसेवक फोडू अशी धास्ती त्यांना आहे. संताजी - धनाजीसारखे त्यांना स्वप्नात एकनाथ शिंदे दिसत आहे. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.