Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईभर खड्ड्यांचे विघ्न

By admin | Updated: July 6, 2015 06:41 IST

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असली तरी रस्त्यांवरील खड्डे अद्याप त्रासदायक ठरत आहेत.

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असली तरी रस्त्यांवरील खड्डे अद्याप त्रासदायक ठरत आहेत. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू झाल्याने बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने खड्ड्यांचा मुद्दा काढत प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत. प्रशासनाने यावर समितीला १५ आॅगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे नवे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे ठेकेदारांनी रस्त्यांवरील खड्डे लवकर भरले नाहीत तर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देत राज्य सरकारने आपली बाजू सावरली आहे.मुंबई आणि उपनगरांतील रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्यासाठी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह आयुक्त अजय मेहता यांनी वारंवार पाहणी दौरे आयोजित करीत मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मात्र जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसाने मुंबईच्या रस्त्यांची चाळण केली आहे. विशेषत: मोठ्या रस्त्यांलगतच्या चिरा आणि छोट्या रस्त्यांवरील खड्ड्यांनी महापालिकेच्या नाकी नऊ आणले असून, त्यात आता दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे समितीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या पाठी तगादा लावला आहे.दुसरीकडे गणेशोत्सवाच्या काळात अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते झाले पाहिजेत. यासाठी ठेकेदारांनी लवकरात लवकर रस्त्यांवरील खड्डे भरावेत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी शनिवारी दिली आहे. मुंबई आणि पुणे परिसरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अशावेळी विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमधील रस्त्यांच्या प्रश्नांवर आयोजित पोटे-पाटील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची योग्य ती अंमलबजावणी झाली नाही तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. एकंदर महापालिकेने समितीला दिलेले आश्वासन आणि राज्यमंत्र्यांनी ठेकेदरांना दिलेली तंबी, या दोन्ही प्रकरणांत गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले नाहीत तर मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच रस्त्यांवरील खड्ड्यांचा अधिक त्रास होणार असल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट आहे.