बोर्डी : डहाणू पोलीस स्टेशन अंतर्गत नरपड येथील सागरी पोलीस चौकी परिसराचा वापर मद्यपार्ट्यांकरीता केला जात आहे. तालुक्यातील खून, दरोडा, रस्ते अपघात आदी घटनांत वाढ झाली असताना मद्यपींनी पोलीस चौक्यांना लक्ष्य केल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून तीन कि. मी. अंतरावर डहाणू पोलीस स्टेशनअंतर्गत नरपड सागरी पोलीस चौकी आहे. सागर सुरक्षा कवच, रस्ता सुरक्षा अभियान या व्यतिरीक्त वर्षातील मोजके दिवस पोलीस तैनात असतात त्यामुळे गैरप्रकारात वाढ झाली आहे. काही वर्षापूर्वी नरपड चौकीचे नूतनीकरण करण्यात आले.त्यामुळे आधी चौकी म्हणून वापरली जात असलेली जुनी पत्र्याची केबीन पडून असल्याने मद्यपींनी पार्ट्यांकरीता तिचा वापर सुरू केला आहे. संध्याकाळी दुचाकी-चारचाकी गाड्यांतून येणारे मद्यपी चौकीच्या आत, परिसरात ग्रुपने बसतात. शनि, रवि या सुट्टीकाळात हे प्रमाण वाढते. यामध्ये अल्पवयीन तरूणांचा समावेश असतो. म्युझिकच्या तालावर बीभत्स नृत्य, बॅरेकेड्सची मोडतोड, बाईक रेसिंग, नागरीकांशी गैरवर्तन आदी प्रकार वाढले आहेत. चौकीच्या आवारात मद्यबाटल्या, प्लास्टीक ग्लास व खाद्यपदार्थांच्या पिशव्यांचा कचरा साचला आहे. नरपड खाडीपूल, समुद्रकिनारा, सुरुंच्या बागेत रात्री उशीरापर्यंत अश्लील चाळे करणाऱ्यांचे फावले आहे. पथदिवे आणि नरपड चौकीत पोलीस बंदोबस्त नसल्याने सायंकाळी साडेसातनंतर डहाणू-बोर्डी सागरी मार्गावरचा प्रवास धोकादायक बनल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तळीरामांचे गैरवर्तन व त्यातून आपल्या जीवाला उद्भवणारा धोका लक्षात घेऊन अनेकांनी इव्हनींग वॉकला जाणे टाळले आहे.नाताळ व नववर्षाच्या स्वागताला परगावातील पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस चौक्यांवर सुरक्षा वाढविण्याची मागणी होत आहे.
पडीत चौकीत तळीरामांचा अड्डा
By admin | Updated: December 25, 2014 22:48 IST