Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:01 IST

मुंबई विद्यापीठाने आपल्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठाकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठाकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील एमएससी (सेमिस्टर १, सेमिस्टर ३), वाणिज्य शाखेतील बीकॉम (सेमिस्टर ५, सेमिस्टर ६) एमएमएम ( सेमिस्टर १) एमएचआरडीएम, एमएफएम, एमएफएसएम व कला शाखेतील एमए, बीए, एमएडच्या परीक्षा एक ते दीड महिना पुढे ढकलल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्र विद्यापीठाने जाहीर केले आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने निकालही लांबणीवर पडणार आहेत.या अगोदरच्या सेमिस्टरचे निकाल आताच लागले आहेत. काही परीक्षांचे निकाल पुढील आठवड्यात लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना काही वेळ मिळावा. नव्या परीक्षांसाठीच्या तयारीला वेळ मिळावा, यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. दरम्यान, मागील सेमिस्टरनंतरचा ९० दिवसांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे सर्वच महाविद्यालयांत अभ्यासक्रम पूर्ण झाला असल्याचेही विद्यापीठाने जाहीर केले आहे. या परीक्षा एप्रिल महिन्यात घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते, परंतु शनिवारी विद्यापीठाने परीक्षा एक ते दीड महिना पुढे ढकलून नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.मुंबई विद्यापीठाने वेळापत्रकात केलेले बदलतीन दिवसांवर आलेल्या बी. कॉम. ची परीक्षा मे महिन्यात होईल. १० एप्रिल रोजी होणारा बीकॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट सेमिस्टर ५, फायनान्शियल मार्केट्स सेमिस्टर ५, अकाउंटिंग अँड फायनान्स)चा पेपर आता २ मे रोजी घेतला जाईल, तसेच १६ एप्रिलपासून सुरू होणारी एमएससीची परीक्षा २ जूनपासून सुरू होणार आहे. १८ एप्रिल रोजी होणारी एमएची परीक्षा २१ मे रोजी होईल. १० एप्रिल रोजी होणारी एमएडची परीक्षा १५ मे रोजी होणार आहे.

टॅग्स :मुंबई