Join us

विनयभंग प्रकरणी पोस्टमन अटकेत

By admin | Updated: May 30, 2014 01:02 IST

टपाल देण्यासाठी गेलेल्या प्रदीप मंंचेकर (५१) या पोस्टमनला लिफ्टमध्ये महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पंतनगर पोलिसांनी अटक केली.

मुंबई : टपाल देण्यासाठी गेलेल्या प्रदीप मंंचेकर (५१) या पोस्टमनला लिफ्टमध्ये महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पंतनगर पोलिसांनी अटक केली. घाटकोपरमधील ही महिला आणि तिच्या पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. या महिलेने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्या संदर्भात बुधवारी ती पंतनगर टपाल कार्यालयात आलेली कागदपत्रे आपल्याला मिळतील, अशी विचारणा करण्यासाठी तेथे गेली होती. तेथील अधिकार्‍यांनी पासपोर्टसंदर्भातील कागदपत्रे टपाल कार्यालयात आली असून, ती पतीच्याच पत्त्यावर मिळतील, असे सांगत या महिलेसोबत मंचेकर या पोस्टमनला पाठविले होते. दुपारी मंचेकर हे महिलेसोबत घाटकोपर (पूर्व) येथील कुपरेजा पॅलेस या पतीच्या राहत्या ठिकाणी गेले आणि कार्यालयातील कागदपत्रे महिलेच्या सासूकडे सोपवून निघाले. मात्र सासूने ती कागदपत्रे महिलेला दिली नाहीत. त्यानंतर पोस्टमन मंचेकर आणि ती महिला लिफ्टमधून खाली उतरताना मंचेकरने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्या महिलेने केली. मंचेकरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश निर्मल यांनी दिली.