Join us

पोस्टाचा कारकून पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: November 26, 2015 02:51 IST

अब्दुल करीम तेलगीप्रमाणे पोस्टाचे बनावट स्टॅम्प तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टपाल खात्यातील एका कारकुनास मुंबई पोलिसांनी गजाआड केले

डिप्पी वांकाणी, मुंबईअब्दुल करीम तेलगीप्रमाणे पोस्टाचे बनावट स्टॅम्प तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टपाल खात्यातील एका कारकुनास मुंबई पोलिसांनी गजाआड केले. २५ रुपयांचे १० लाख किमतीचे बनावट स्टॅम्प बनवून विकण्याचा त्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. दुकानदाराने पोलिसांना योग्य वेळी माहिती दिल्याने कारकून जाळ्यात अडकला. विशेष म्हणजे या कारकुनाने पोस्ट खात्याच्या लेटरहेडवर बनावट पत्रही तयार करून आणले होते.पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील टपाल कार्यालयात विनायक हा कारकून गेली ४-५ वर्षांपासून काम करीत आहे. त्याने २५ रुपयांचे ४० स्टॅम्प घेऊन एक दुकान गाठले आणि त्याच्या तब्बल १००० प्रतिलिपी काढण्यास सांगितले. दुकानदारास संशय आला असता कारकुनाने त्याला टपाल खात्याचे पत्रच दाखवले व आपण कार्यालयीन काम करीत आहोत, असे भासवले. हाच कारकून दुसऱ्या दुकानात गेला असता त्या दुकानदाराने थेट पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आम्ही त्याला अटक केली, असे मिश्रा यांनी सांगितले.