Join us

विधानसभेची पायरी न चढलेल्यांना पदाचे डोहाळे

By admin | Updated: August 11, 2014 22:39 IST

राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्याला पवार, तटकरे, जाधव अनुपस्थित

रत्नागिरी : जे कधी विधानसभेची पायरीही चढलेले नाहीत, त्या शिवसेना पक्षप्रमुख, मनसेप्रमुखांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचे डोहाळे लागले आहेत. मीडियावरील जाहिरातबाजीवर ३६ हजार कोटींचा खर्च करून केंद्रीय सत्तेत पोहोचलेल्या नरेंद्र मोदींमुळे त्यांनाही राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडू लागले आहे. मात्र, यांच्याकडे काय अनुभव आहे, असा सवाल कामगारनेते आमदार किरण पावसकर यांनी केला. येथील सावरकर नाट्यगृहात आयोजित राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा निर्धार मेळाव्यात पावसकर बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, पक्षाचे उपाध्यक्ष रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, सरचिटणीस बाबाजी जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा जाधव, जिल्हा महिला आघाडीप्रमुख स्मितल पावसकर उपस्थित होते. पावसकर यांनी आपल्या भाषणात खासदार अनंत गीते यांच्यावर तसेच जैतापूर ऊर्जा प्रकल्पाबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मीडियाद्वारे दाखविण्यात आलेल्या येत्या विधानसभेत चित्र काय असेल, याबाबतच्या फसव्या निवडणूकपूर्व अंदाजाने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्याकडे खरेखुरे अंदाज आहेत. दापोली विधानसभा जागा राष्ट्रवादीला मिळावी, ही मागणी योग्यच आहे. त्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आग्रह धरणार आहोत, असेही ते म्हणाले. माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले, राजकारण हा ऊन पावसाचा खेळ आहे. लोकसभेला आलेली त्सुनामी ओसरली आहे. सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले. (प्रतिनिधी)बडे-बडे गैरहजरया मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कामगार मंत्री भास्कर जाधव हे तीनही बडे नेते गैरहजर होते. यातील अजित पवार आणि सुनील तटकरे हे सांगलीमधील एका कार्यक्रमासाठी गेले होते.