Join us  

महा चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 9:53 PM

सध्या मध्य पूर्व अरबी समुद्रात महा चक्रीवादळ आले आहे.

मुंबई : सध्या मध्य पूर्व अरबी समुद्रात महा चक्रीवादळ आले आहे. येत्या २४ ते ३६ तासांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर पूर्व  ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीकडे वळेल. त्यामुळे पुढील ४८ तासांत मुंबईत हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवस मुख्यत: उबदार असेल व रात्र आल्हाददायक राहील. दिवसाचे तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान तर रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. मंगळवारी ५ नोव्हेंबरच्या सुमारास चक्रीवादळ महा मुंबईच्या उत्तरेजवळ येईल. परिणामी, शहरात पावसाचा जोर वाढेल, तसेच ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी शहरात मध्यम पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या काळात मध्यम वारे वाहतील. महा चक्रीवादळ भारतीय किना-यापासून दूर नैऋत्य दिशेने जात आहे. आज सायंकाळपर्यंत तीव्रतेत वाढ होऊन चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ भारताकडे वळण्याची शक्यता असून, पूर्व-ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किना-याकडे वळण्याची शक्यता आहे.तीव्र चक्रीवादळ महा हे मागील ६ तासांत १४ किमी प्रति तासाच्या वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे. २ नोव्हेंबर रोजी १७:३० वाजता ते अक्षांश १७ अंश उत्तर आणि ६७.३ अंश पूर्वेस होते. भौगोलिकदृष्ट्या हे वेरावळच्या दक्षिण-नैऋत्येकडे ५२० किमी आणि दीवच्या ५४० किमी दक्षिण-नैऋत्येकडे आहे. सध्याच्या हवामान प्रारूपांच्या अनुसार, थंड तापमान असलेला समुद्राचा पृष्ठभाग, तसेच वातावरणातील दोन थरांतील वा-यांच्या  वेगातील तफावत मध्यम राहण्याची शक्यता असल्याने चक्रीवादळ वक्र झाल्यानंतर कमकुवत होण्यास सुरुवात होईल, तर ५ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा तीव्र चक्रीवादळाच्या रूपात कमकुवत होईल. त्यानंतर हे आणखी कमकुवत होईल आणि किना-यावर पोहोचण्यापूर्वी चक्रीवादळ होईल.चक्रीवादळ जमिनीवर पोहोचण्याच्या वेळेस तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी किंवा ७ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास दक्षिण गुजरात किना-यावर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. गुजरातच्या जमिनीवर पोहोचण्याच्या वेळेस ते चक्रीवादळ किंवा कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. चक्रीवादळ म्हणून जर ही प्रणाली जमिनीवर आली, तर अत्यंत खवळलेला समुद्र आणि मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम अधिकच वाईट असेल, अशी भीती वर्तविण्यात आली आहे.जेव्हा ही प्रणाली एखादे चक्रीवादळ किंवा कमी दाबाचा पट्टा म्हणून गुजरात किनारपट्टीला धडकेल, तेव्हा जोरदार वारे आणि समुद्रात प्रचंड लाटा उसळण्याची शक्यता आहे. वा-यांचा वेग ७०-८० किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो. लाटांची उंचीदेखील जास्त असेल, ज्यामुळे संभाव्य नुकसान अपेक्षित आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत तुरळक हलक्या सरींची नोंद झाली असून, दिवसभर हवामान उबदार होते व रात्र आल्हाददायक होती. चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी ५ नोव्हेंबर पर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार समुद्रात आहेत त्यांनी लवकरात लवकर किना-यावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरनंतर त्याचा वेग वाढून ६० ते ७० किमी प्रति तास वेग होईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

अतिवृष्टीचा इशारा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये वा-याचा वेग जास्त असणार असल्याने मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीस सज्ज राहण्यासाठी जिल्हा यंत्रणांना निर्देश देण्यात आले असून, मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे.