Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य,पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पावसाळ्यात धोक्याची शक्यता

By admin | Updated: May 21, 2014 04:27 IST

पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून रेल्वेसेवा विस्कळीत होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मुंबई : पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून रेल्वेसेवा विस्कळीत होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरील १३ तर पश्चिम रेल्वेवरील नऊ ठिकाणे धोकादायक असून, यावर रेल्वेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करताना नालेसफाई केली जात असून, पंप मशीन आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रेल्वेला सेवेला मोठा फटका बसत असतो. नालेसफाई न झाल्याने किंवा भरतीची वेळ असल्याने पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभर रेल्वे विस्कळीत होते. यंदा रेल्वेला फटका बसू नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा, परेल, सायन, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, कांजुरमार्ग, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कल्याण आणि चुनाभट्टी या पाणी साचणार्‍या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पाणी साचतानाच सिग्नल यंत्रणेला त्याचा फटका बसत असल्याने मल्टी सेक्शन डिजिटल एक्सेल काउंटर ही यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वने सांगितले. त्याचप्रमाणे सीएसटी ते कांजूरमार्गपर्यंतचे ३0, कांजूरमार्ग ते ठाकुर्लीपर्यंतचे १३, सीएसटी ते मानखुर्दपर्यंतच्या २९ नाल्यांची सफाई मे अखेरपर्यंत केली जाणार असल्याचा दावा केला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मरिन लाइन, चर्नी रोड ते ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन रोड, दादर, माहीम, वांद्रे ते खार, अंधेरी ते जोगेश्वरी आणि नालासोपारा ते विरार ही ठिकाणे धोकादायक असून त्यावर रेल्वेकडून लक्ष देण्यात येणार असून, या ठिकाणी ट्रॅकची उंची वाढवण्यात आली आहे. तसेच साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल पंपही तयारीत ठेवले जाणार आहेत.