Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहा जिल्ह्यांत अजूनही पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तरीही कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका टळलेला नाही, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तरीही कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका टळलेला नाही, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत अजूनही पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे.

राज्यातील सहा जिल्ह्यांतील संसर्ग अजूनही कमी झालेला नाही, त्यामुळे यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाचा धाेका कायम आहे.

याविषयी, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, राज्यात २० हून अधिक जिल्ह्यातील जनजीवन पूर्ववत झाले असून मुंबई, नाशिकसारख्या शहरातील साथ आटोक्यात आली आहे. मात्र केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तेथील निर्बंध काहीसे कठोर आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांत सातत्याने चाचण्यांचे प्रमाण, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या, दैनंदिन रुग्ण यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, दुसरीकडे लसीकरणालाही गती देण्याचा प्रयत्न आहे. रुग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसल्यास पुन्हा निर्बंध कठोर करावे लागणार आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून सरासरी ११ हजार ३० दैनंदिन रुग्णांची नोंद होते आहे. ७ ते १३ जूनदरम्यान राज्यात ७७ हजार २११ रुग्णांची नोंद झाली, तर त्यापूर्वी ३० मे ते ६ जूनदरम्यान १ लाख ३ हजार ४८९ रुग्ण आढळून आले आहेत. या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या १४ हजार ७८४ असल्याचे दिसून आले आहे.

..........................................