Join us

देशाच्या विकासात बंदरांचा मोठा वाटा

By admin | Updated: April 19, 2015 01:52 IST

देशाच्या विकासात बंदरांचा वाटा मोठा आहे. त्यासाठी राज्यातील बंदरांचा विकास करणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून तसे धोरणही आखण्यात आले आहे,

मुंबई : देशाच्या विकासात बंदरांचा वाटा मोठा आहे. त्यासाठी राज्यातील बंदरांचा विकास करणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून तसे धोरणही आखण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत दिली़ बंदरांची क्षमता वाढवली तर त्याचा राज्याला मोठा फायदा होईल. उत्पन्न वाढेल, नोकऱ्या उपलब्ध होतील आणि राज्यातील अनेक प्रश्न सुटतील, असेही ते म्हणाले.दिघी बंदर-रोहा स्थानक रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात रेल्वे विकास बोर्ड लिमिटेड आणि दिघी पोर्ट लिमिटेड यांच्यात शनिवारी सामंजस्य करार झाला. याप्रसंगी ते बोलत होते़ फडणवीस म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने गेली १५ वर्षे बंदर विकासाकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे या माध्यमातून होणारा कोट्यवधींचा व्यवसाय अन्य राज्यांत गेला. महाराष्ट्राचे नुकसान झाले व अन्य राज्यांचा विकास झाल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे विकास बोर्ड लिमिटेडचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक एस. सी. अग्निहोत्री, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी आणि दिघी पोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते. नागपूर रेल्वेचे ‘हब’ बनल्यास फायदापरिवहन व्यवस्थेच्या विकासासाठी नागपूर हे अतिशय सुलभ आहे. नागपूर हे रेल्वेचे केंद्र बनल्यास मोठा फायदा होईल, असे रेल्वेमंत्री प्रभू यांनी सांगितले. हे भाग कोकणातील बंदरांशीही जोडले गेल्यास बंदरांचा चेहरामोहराच बदलले, असा दावाही त्यांनी केला़ (प्रतिनिधी)पर्यावरणाचा समतोल राखून बंदरांचा विकास - रेल्वेमंत्री बंदरांच्या विकासामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल. देशातील सर्व बंदरे रेल्वेशी जोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मात्र हा विकास करताना पर्यावरणाचा समतोलही राखला गेला पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या. पुढील पाच वर्षांत ८.५0 कोटी निधी विकासकामांसाठी उभा करण्याचे उद्दिष्ट असून, त्यातून विदर्भ, कोल्हापूर-वैभववाडी, कराड-चिपळूण आदी प्रकल्पांवरही भर दिला जाईल. १८ महिन्यांत ईस्टर्न कोस्ट प्रकल्प : पूर्व किनारपट्टीच्या (ईस्टर्न कोस्ट) दृष्टीने महत्त्वाचे असणारे सागरी प्रकल्प येत्या १८ महिन्यांत मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी निविदा प्रक्रियाही लवकरच मार्गी लावली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र पश्चिम किनारपट्टीमधील प्रकल्प मार्गी लागण्यास थोडा वेळ लागेल. यात अनेक अडचणी असून, त्यातून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.