लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कामगार कपात झाली. मात्र, अशा परिस्थितीत मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कामगार संघटना सकारात्मक कार्य करीत असून, उत्पन्न वाढविण्यासाठी विधायक सूचना करतात. मुंबई शहराच्या विकासात पोर्ट ट्रस्टबरोबर कामगारांचाही मोठा सहभाग आहे, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी कामगार प्रशिक्षणाच्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. कोरोनाच्या काळात भारतीय प्रशिक्षण संस्थेतर्फे १८ कार्यक्रमांचे राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन आयोजन करून कामगार शिक्षणाचे चांगले कार्य सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
भारतीय श्रमिक प्रशिक्षण संस्था व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सभागृहात ‘कोरोनाच्या काळात कामगार संघटनांसमोरील आव्हाने’ या विषयावर नुकतेच एकदिवसीय कामगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते एस. के. शेट्ये म्हणाले, आव्हानांचा सामना करीत असताना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनने शंभर वर्षे पूर्ण केली. हजारो कामगारांचे सहकार्य व निष्ठावंत कार्यकर्ते हीच संघटनेची खरी ताकद आहे. भारतीय कामगार शिक्षण मंडळाचे संचालक सुधाकर अपराज यांनी युनियनमध्ये काम करीत असताना कामगारांना पगारवाढ, बोनस या मागण्यांबरोबर देशाचा विकास झाला पाहिजे, असे सांगितले.
भारतीय श्रमिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक रमेश मडवी म्हणाले, कामगार शिक्षणामुळे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. कामगारांना हक्काची, कर्तव्यांची, अधिकारांची व लढ्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. परेश चिटणीस यांनी शारीरिक व मानसिक आरोग्य कसे असावे याबाबत माहिती दिली. युनियनचे सचिव विद्याधर राणे यांनी जहाजतोडणी उद्योग व त्यामधील कामगारांच्या समस्या याबाबत माहिती दिली. अस्मिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर युनियनचे सचिव विजय रणदिवे यांनी आभार मानले. सर्व कामगार प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
.....................