Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; मुख्याध्यापकावर गुन्हा

By admin | Updated: February 26, 2015 22:43 IST

तिसरी ते सहावी इयत्तेतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

महाड : तिसरी ते सहावी इयत्तेतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महाड तालुक्यातील गांधारपाले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संभा नामदेव तितरे (५८, रा. भीमनगर, महाड) असे या मुख्याध्यापकाचे नाव असून दोन महिन्यानंतर तो निवृत्त होणार आहे.गांधारपाले गावातील शाळेत इयत्ता तिसरी ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींशी हा मुख्याध्यापक गेल्या दोन वर्षांपासून अश्लील चाळे करीत होता. मात्र त्याच्या दहशतीमुळे ही बाब विद्यार्थिनींनी कोणाला सांगितली नव्हती. पंधरा दिवसांपूर्वी मुख्याध्यापक रजेवर गेले असता, विद्यार्थिनींनी शिक्षिकेला या प्रकाराबाबत सांगितली. त्यावेळी मुख्याध्यापक तितरे यांनी, आपल्यावर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार केल्याची माहिती विद्यार्थिनींनी शिक्षिकेला दिली. शिक्षिकेने याबाबत केंद्र प्रमुख स्रेहा वीरकर यांना माहिती दिली. वीरकर यांनीही पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सुधीर महामुनी यांना याबाबत कळवले. मात्र त्यानंतर गटशिक्षण अधिकारी महामुनी यांनी चौकशी अथवा कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थ व पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी गुरुवारी शाळेत गोंधळ घालून मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली.गांधारपाले शाळेला गटविकास अधिकारी संघरत्ना खिलारे आणि गटशिक्षणाधिकारी महामुनी यांनी भेट दिली. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. मुख्याध्यापक तितरेने मुमुर्शी शाळेवर असतानाही अशाच प्रकारे गैरवर्तन केले होते. त्यावेळी त्याची बदली करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून याप्रकरणी चौकशी करुन संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पं.स. गटविकास अधिकारी संघरत्ना खिलारे यांनी दिले.