Join us  

कुर्लामधील पूनम महाजन यांच्या मताधिक्यात ७३३४ मतांची घट, युतीसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 2:38 AM

उत्तर मध्य मुंबईतील कुर्ला मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांचे मताधिक्य २०१४ च्या तुलनेत तब्बल ७३३४ मतांनी घटले आहे.

- खलील गिरकरउत्तर मध्य मुंबईतील कुर्ला मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांचे मताधिक्य २०१४ च्या तुलनेत तब्बल ७३३४ मतांनी घटले आहे. या मतदारसंघात महाजन यांना ६६ हजार ६२५ मते मिळाली आहेत. तर, कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना ६१ हजार ३८४ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात एकूण मतदान १ लाख ३९ हजार १४० झाले होते. या ठिकाणी महाजन यांना केवळ ५२४१ मताधिक्य मिळाले आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत एमआयएमला झालेले मतदान यावेळी वंचित ऐवजी कॉंग्रेसकडे वळले आहे त्यामुळे त्याचा लाभ दत्त यांना झाला आहे. शिवसेना भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.कुर्ला मतदारसंघात शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आमदार कार्यरत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात कुडाळकर यांना ४१ हजार ५८० व भाजपच्या विजय कांबळे यांना २८ हजार अशा प्रकारे दोन्ही पक्षांना ६९ हजार ५८० मते मिळाली होती. या दोन्ही पक्षांची लोकसभेला युती झालेली असताना या ठिकाणी महाजन यांना लोकसभेला ६६ हजार ६२५ मते मिळाली आहेत. म्हणजे शिवसेना व भाजपने आपले मतदान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. कॉंग्रेसचे ब्रम्हानंद शिंदे यांना १२ हजार ८५५ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिलींद कांबळे यांना १४ हजार १९४ असे मिळून २७ हजार मते मिळाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या मतात लक्षणीय वाढ झाली असून दत्त यांना ६१ हजार ३८४ मते मिळाली आहेत. एमआयएमच्या अविनाश बर्वे यांनी २५ हजार ७४१ मते घेतली होती. वंचित आघाडीऐवजी ही मते आपल्याकडे वळवण्यात कॉंग्रेसच्या दत्त यांना यश आले आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या मतदारसंघात २०१९ मध्ये ९३०० जास्त मतदान झाले आहे त्यापैकी महाजन यांच्या खात्यात केवळ ९६१ मतांची वाढ झाली आहे तर दत्त यांच्या मतांमध्ये मात्र ८२९५ मतांची वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघात केवळ ७८६२ मतांवर समाधान मानावे लागले आहे. या मतदारसंघात दलित व अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र त्याचा लाभ वंचित आघाडीच्या उमेदवाराला झालेला दिसून आला नाही त्याऐवजी ही मते कॉंग्रेसकडे वळल्याचे चित्र आहे.२०१४ मध्ये महाजन यांना ६५ हजार ६६४ मते व प्रिया दत्त यांना ५३ हजार ०८९ मते मिळाली होती. एकूण मतदान १ लाख २९ हजार ८४० झाले होते महाजन यांना १२ हजार ५७५ मताधिक्य मिळाले होते.>विधानसभेवर काय परिणाम१) दलित व मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने गेल्या निवडणुकीत या ठिकाणी एमआयएमचा उमेदवाराने लक्षणीय मते घेतली होती. मात्र यावेळी ही मते कॉंग्रेसकडे वळल्याचे चित्र आहे. त्यामुळे वंचित आघाडीला या ठिकाणी फटका बसू शकतो.२) शिवसेना व भाजपची एकत्रित शक्ती इतर पक्षांपेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी महाजन यांना मताधिक्य मिळाले आहे. मात्र दत्त यांच्या मतदानामध्ये ८२९५ मतांची वाढ झालेली असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी चांगले चिन्ह आहे.३) हा मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेना भाजपला अधिक परिश्रम घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :पूनम महाजनलोकसभा निवडणूक २०१९