Join us
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरार्डनगर येथील भुयारी मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:07 IST

मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील एव्हरार्डनगर येथे असणाऱ्या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या भुयारी मार्गामध्ये सतत पाणी ...

मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील एव्हरार्डनगर येथे असणाऱ्या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या भुयारी मार्गामध्ये सतत पाणी साचलेले असते. त्यामुळे या साचलेल्या पाण्यात पेवर ब्लॉक टाकून नागरिकांना वाट काढावी लागते. अनेकदा मार्गातील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांना जीव मुठीत घेऊन या भुयारी मार्गातून चालावे लागते.

सायन-पनवेल मार्गावर चुनाभट्टी व सोमय्या रुग्णालय, एव्हारार्ड नगर सोसायटी तसेच तेथे असणाऱ्या बसस्थानकांवर जाण्यासाठी या भुयारी मार्गाचा एकमेव व पर्याय येथील नागरिकांना उपलब्ध आहे. मात्र या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने आता नेमके जायचे तरी कुठून असाच प्रश्न या परिसरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पडला आहे.

एव्हारार्डनगर येथील मार्गावर गाड्यांची सतत वेगाने ये-जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे. हेच लक्षात घेता या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली होती मात्र हा भुयारी मार्ग आता नागरिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. सोमय्या रुग्णालयात येणारे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या भुयारी मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पावसाळ्याच्या वेळी या भुयारी मार्गात सतत पाणी साचलेले असते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते. परंतु आता उन्हाळ्यातदेखील या भुयारी मार्गात पाणी साठू लागल्याने नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे.

दिनेश हळदणकर (सामाजिक कार्यकर्ते)

- एव्हारार्डनगर येथील भुयारी मार्गाची डागडुजी न झाल्याने मागील अनेक वर्षे हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी त्रासदायक बनला आहे. याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला, मात्र या समस्येकडे लक्ष दिले गेले नाही. प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी एव्हरार्डनगर हायवेवर पादचारी पूल बांधावा. तसेच हा भुयारी मार्ग दुरुस्त करून रुग्णांच्या सोयीसाठी सोमय्या रुग्णालयापर्यंत वाढविण्यात यावा.