मुंबई : आधीच चेंबूरमधील प्रदूषणाने नाकीनऊ आणले असताना आता स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवूनही चेंबूरमध्ये ठिकठिकाणी रिलायन्स ‘फोर-जी’ मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खोदकाम सुरू असल्याने वाहतुकीमुळे वायुप्रदूषण होऊन चेंबूरकरांना प्रदूषणाचा ‘डबल फटका’ बसत आहे.चेंबूरमधील पालिकेच्या सतरा मोकळ्या मैदानांवर आणि उद्यानात रिलायन्स ‘फोर-जी’ टॉवर उभारण्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. रहिवाशांना ही बाब समजताच त्यांनी या टॉवरना मैदानात उभारण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी हे काम बंद करण्यात आले. मात्र नागरिकांचा विरोध मावळल्याचे भासताच पुन्हा एकदा हे टॉवर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी रस्त्यांलगत सध्या मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ‘फोर-जी’ची केबल टाकण्यात येत आहे. या खोदकामासाठी रिलायन्सने खास इंग्लंडमधून ‘मायक्रो ट्रेन्चिंग वर्मियर’ हे मशिन मागवले आहे. या मशिनच्या कटरद्वारे रस्ता सरळ रेषेत खोदला जातो. प्रसंगी लोखंडदेखील कापले जाते. सध्या या मशिनद्वारे ४०० एमएम रस्त्याचे खोदकाम करून ‘फोर-जी’केबल टाकली जाते. मात्र जेव्हा या मशिनद्वारे रस्ता खोदला जातो, तेव्हा निघणारे धुळीचे कण प्रचंड वेगात बाहेर फेकले जातात. चेंबूरच्या घाटला गाव रस्ता, केळकर वाडी, सेंट अँथोनी रोड, डायमंड गार्डन, सुभाषनगर या भागात या मशिनद्वारे केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. जेथे हे काम सुरू आहे, तेथे मोठ्या लोकवस्तीसह शाळा, रुग्णालये, प्रार्थनास्थळे आहेत. त्यामुळे परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. धुळीच्या कणांचे प्रमाण प्रचंड असल्याने सर्दी, खोकला व दम्याचे रुग्ण सध्या खासगी रुग्णालयात आढळत आहेत. अशा प्रकारचे खोदकाम सध्या चेंबूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेने बनवलेले रस्ते मधोमध कापले जात आहेत. त्यामुळे नुकतेच चांगले बनवलेले रस्ते खराब होत आहेत. पालिका मात्र याकडे कानाडोळा करत आहे. खोदकाम सुरू असताना रस्तादेखील अडवला जात असल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ यावर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
चेंबूरमध्ये प्रदूषणाचा फटका
By admin | Updated: December 22, 2015 00:54 IST