Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपासाठी घेणार १८ जुलैला मतदान!

By admin | Updated: July 5, 2017 06:54 IST

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने घ्यावी, या मागणीसाठी बेस्ट संयुक्त कामगार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने घ्यावी, या मागणीसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेस्टमधील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या या कृती समितीने मंगळवारी, १८ जुलैला ‘संप करावा की करू नये’ या मुद्द्यावर कामगारांचे मतदान घेण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी बेस्टच्या विविध आगारांमध्ये ५ ते १७ जुलैदरम्यान द्वारसभा घेण्यात येणार आहेत.बेस्ट कामगार महापालिकेचे कामगार असून त्यांचे मासिक वेतन आणि इतर भत्ते देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारावी, अशी कृती समितीची प्रमुख मागणी आहे. शिवाय करारात ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मासिक वेतन मिळायला हवे. मात्र गेल्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने कृती समितीला आक्रमक पवित्रा घ्यावा लागत असल्याचे समितीमधील निमंत्रकांनी सांगितले. यासंदर्भात कामगारांत जनजागृती करण्यासाठी बुधवारी, ५ जुलैला दादर, बॅकबे आणि मध्य मुंबईतील आगारांमध्ये द्वारसभांनी आंदोलनाला सुरुवात होईल. त्यानंतर देवनार, प्रतीक्षा नगर, आण्विक आगार, मागाठाणे, मजास, दिंडोशी, शिवाजीनगर, मुलुंड, वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, मरोळ, सांताक्रूझ, गोरेगाव, मालाड, मालवणी, गोराई, पोयसर, वडाळा या आगारांमध्ये द्वारसभा होतील. दादर कार्यशाळेतील द्वारसभा दुपारी १२ वाजता होईल. तर इतर सर्व सभा या दुपारी २.३० वाजता पार पडतील. वडाळा आगाराच्या द्वारसभेत सर्व आगारांतील कामगारांनी सामील व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.कृती समितीमध्ये या संघटनांचा सहभागकामगार संघटनांनी एकत्रित येत तयार केलेल्या कृती समितीमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, बेस्ट कामगार संघटना, समर्थ बेस्ट कामगार संघटना, भाजपा बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉईज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटना या संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व संघटनांच्या कामगारांनी द्वारसभा आणि मतदानाच्या प्रक्रियेत सामील होण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.