Join us  

मतदानकेंद्रात सेल्फी नाही; शंभर मीटरबाहेर काढता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 1:57 AM

मतदान केंद्रांवर मोबाइलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी आहे. त्यामुळे केंद्रावर कोणीही मोबाइल चित्रीकरण करू नये. मात्र, केंद्रापासून शंभर मीटरच्या बाहेर सेल्फी काढता येणार आहे.

मुंबई : मतदान केंद्रांवर मोबाइलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी आहे. त्यामुळे केंद्रावर कोणीही मोबाइल चित्रीकरण करू नये. मात्र, केंद्रापासून शंभर मीटरच्या बाहेर सेल्फी काढता येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघांतील नवमतदारांसाठी सेल्फी स्पर्धाच ठेवली आहे.

माय फर्स्ट वोट, माय सेल्फी अशी ही स्पर्धा आहे. मतदारांनी सेल्फी काढून ९३७२८३००७१ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठवावा. फोटोसोबत आपले नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, ईपीक नंबर असेल तर तो अथवा यादी भाग क्रमांकाची नोंद करावी. तसेच निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हाधिकारी प्रशासन सज्ज झाले आहे. शहर जिल्ह्यात १५ हजार तर उपनगरात ३३ हजार असे सुमारे ४८ हजार अधिकारी-कर्मचारी मतदानाच्या प्र्रत्यक्ष कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. शहर आणि उपनगर जिल्ह्यातील ३६ विधानसभा मतदारसंघनिहाय नेमलेल्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व इतर मतदान साहित्याचे वाटप रविवारी करण्यात आले.

संबंधित अधिकारी व कर्मचारी हे साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले. उपनगर जिल्ह्यात एकूण ६० हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रियेशी संबंधितांना विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्रांवर जमण्यास सांगण्यात आले होते. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाºयांना एअरपोर्ट कॉलनी येथील मतदान केंद्रावर जमण्याचे निर्देश देण्यात आले होते. मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी व शिपाई असे पथक प्रत्येक मतदान केंद्रासाठी तयार करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता कामावर रुजू झालेले हे अधिकारी, कर्मचारी सोमवारी मतदान संपल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किमान रात्रीपर्यंत कामावर रुजू राहणार आहेत. सोमवारी पहाटे ६ वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल (प्रारूप मतदान) करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येईल. या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर या जबाबदारीच्या व राष्ट्रीय कर्तव्याच्या कामाबाबत उत्साह दिसून येत आहे.

आपत्कालीन स्थितीत मतदान केंद्राध्यक्षांना मोबाइल वापरण्याची परवानगीमतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बंदी घालण्यात आली आहे. केवळ मतदान केंद्राध्यक्षांना मोबाइल वापरण्याची परवानगी देण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठांशी संपर्क साधण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. मतदान पथकातील इतर कर्मचारी व अधिकाºयांना ही परवानगी देण्यात आलेली नाही. मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी शहरात ९० स्थिर, १२० भरारी, ९० व्हिडीओ सर्वेक्षण पथके, २० सूक्ष्म निरीक्षक, १९७ झोनल अधिकारी आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी दक्ष राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकाही रविवारी पार पडल्या. टेबल कोठे लावायचे, कसे लावायचे याची तयारी या वेळी करण्यात आली.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमतदान