Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत भुयारी मार्गाचे राजकारण पेटले

By admin | Updated: April 4, 2015 05:38 IST

वाशी सेक्टर ६ मध्ये बांधण्यात येणारा भुयारी मार्ग व सर्व्हिस रोडवरून राजकारण पेटले आहे. शिवसेना नगरसेवकाने पालकमंत्र्यांना सांगून कामास

नवी मुंबई : वाशी सेक्टर ६ मध्ये बांधण्यात येणारा भुयारी मार्ग व सर्व्हिस रोडवरून राजकारण पेटले आहे. शिवसेना नगरसेवकाने पालकमंत्र्यांना सांगून कामास स्थगिती दिली तर नागरिकांच्या फायद्याच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप केल्याप्रकरणी काँगे्रसने हरकत घेऊन या प्रकाराचा निषेध केला. शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी गांधीगिरी करून श्रमदानाने येथे कच्चा रस्ता बनवून स्थगितीचा अनोखा निषेध नोंदविला. वाशी सेक्टर १ ते ८ मधील नागरिकांना मुंबईकडे, रेल्वे स्टेशन किंवा पनवेलच्या दिशेला जायचे असेल तर शिवाजी चौकातून किंवा अभ्युदय चौकातून जावे लागते. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी जुन्या टोलनाक्याजवळ भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. २००६ मध्ये या ठिकाणी झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता. सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने सेक्टर ६ मध्ये भुयारी मार्गाचे नियोजन केले. त्यानुसार त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. भुयारी मार्गाकडून नवी मुंबई स्पोर्टस् क्लब वाशीगावातील स्वामी प्रणवानंद मार्गाकडे जाणाऱ्या रोडचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. महापालिकेने जानेवारी २०१४ मध्ये या कामास प्रशासकीय मंजुरी दिली व आॅगस्ट २०१४ मध्ये स्थायी समितीने या विषयास मंजुरी दिली. हा रोड झाल्यानंतर नागरिकांना मुंबई, रेल्वे स्टेशन व पनवेलकडे जाण्यासाठी शहरात येण्याची आवश्यकता लागणार नाही. बांधकाम वेगाने सुरू असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी या कामास विरोध दर्शवून ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. शिंदे यांनी १६ मार्चला या कामास स्थगिती दिली आहे. शिवसेनेच्या या जनविरोधी भूमिकेमुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काम पुन्हा सुरू करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. परंतु मंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे काम सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने असमर्थता दर्शविली. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी या परिसरातील रहिवाशांनी शुक्रवारी या ठिकाणी श्रमदान करून कच्चा रस्ता करून गांधीगिरी आंदोलन केले. सकाळी ११ वा. स्वत: काम करून मार्ग तयार करण्यास सहकार्य केले. हा रोड झाल्यास त्याचा फायदा सर्वच नागरिकांना होणार असल्यामुळे त्यावरील स्थगिती त्वरीत उठवावी, अशी मागणी केली आहे. काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनीही या कामासाठी पाठपुरावा केला होता. भुयारी मार्गावरून ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेना व काँग्रेस समोरासमोर आले असून विकासाच्या कामाचे राजकारण पेटले आहे. त्याचे पडसाद निवडणुकीच्या प्रचारात उमटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)