Join us  

उत्तर पूर्व मुंबईत मोनिका मोरेवरून राजकारण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 1:54 AM

राज यांच्या आरोपानंतर सोमय्या यांचा पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना उत्तर पूर्व मुंबईत रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेवरून राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी बुधवारी सभेदरम्यान केलेल्या आरोपानंतर गुरुवारी भाजपचे किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला कुठलीही मदत न करता केवळ प्रसिद्धीचे भांडवल करण्यात आल्याचेम्हणत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिला स्टेजवर आणले. यावर आम्ही मोदी सरकारच्या काळात प्लॅटफॉर्मची उंची वाढवली. आता राज यांची राजकीय उंची कमी झाली. त्यामुळे २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करू नका, असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.पाच वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातात मोनिका मोरेला दोन्हीही हात गमवावे लागले होते. तेव्हा सोमय्यांच्या पुढाकाराने तिला कृत्रिम हात बसविण्यात आले. त्यानंतर, मोनिका मोरे ‘स्वच्छ भारत अभियाना’ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरही झाली. यादरम्यान पदवी मिळाल्यानंतरही नोकरीपासून वंचित असल्याचा आरोप तिने केला आहे. घर, नोकरी देण्याचे आश्वासन तिला देण्यात आले होते. त्यापैकी काहीही देण्यात आले नसल्याचे तिचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाले, अशात घराची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे सध्या कोणीही मदतीसाठी पुढे आले नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर राज यांनी तिला स्टेजवर आणत, किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. रेल्वे अपघातात आतापर्यंत १८,४२३ जणांचा बळी गेला. त्यातही सोमय्यांनी केवळ, मोरेचा वापर करीत प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी दाखवले.असे सुरू आहे राजकारण!राज यांच्या आरोपानंतर सोमय्यांनीही ठाकरेंवर निशाना साधला आहे. या वेळी राज यांची राजकीय उंची कमी झाली आहे. त्यांनी थेट सोमय्यांशी लढावे, २० वर्षांच्या मुलीच्या आडून राजकारण करू नये. मोनिकाला मदत केली. काही महिन्यांपूर्वी ती नोकरीसाठी माझ्याकडे आली होती. तिला ३ कॉल आले, ऑफर लेटरही आले होते, असेही सोमय्यांनी म्हटले. शिवाय, तिला नोकरी हवी असल्यास आपण सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. राजभाऊंनीसुद्धा तशी मदत केल्यास बरे होईल, असेही ते म्हणाले. यावर भाजप उमेदवार मनोज कोटक यांनीही, मनसेकडील सगळे मुद्दे संपले म्हणून मोरेचा आधार घेत असल्याचे सांगून, तिच्यावर राजकारण करू नका, असे म्हटले आहे.तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांच्या मते, मोनिकानेच सत्यपरिस्थिती मांडली. तिची कशा प्रकारे फसवणूक झाली, तिचे जाहिरातीसाठी कसे भांडवल केले? हे काल आख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे अशा थापा मारणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा? याचा विचार मतदारांनी करायला हवा.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019मुंबई उत्तर पूर्व