Join us
Daily Top 2Weekly Top 5

वंडर्स पार्कवरून राजकारण तापले

By admin | Updated: November 5, 2014 04:07 IST

नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील समस्यांवरुन नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे

नवी मुंबई : नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील समस्यांवरुन नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे. वडंर पार्कच्या गैरसोयींबाबत लोकमतने वाचा फोडल्यानंतर महापौर सागर नाईक यांनी सोमवारी पार्कला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर मंगळवारी नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनीही वंडर पार्कचा दौरा करून दोन दिवसांत पार्कमधील सोयसुविधा पूर्ववत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यामुळे वंडर्स पार्कचा मुद्दा राजकीय पटलावर आल्याने उद्यान लवकरच पूर्ववत होईल, असा आशावाद नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.आमदार म्हात्रे यांनी पार्कमधील बंद असलेल्या राइडची माहिती त्यांनी घेतली. तसेच दोन दिवसांमध्ये उद्यान स्वच्छ करुन नागरीकांची गैरसोय दूर करावी, असे आदेशही त्यांनी उद्यान विभागाच्या अधिका-यांना दिले. कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या वंडरपार्कमधील राइड आणि मिनीट्रेन पावसाळ्यापासून बंद आहेत. उद्यानात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे ३५ रुपये शुल्क भरुन उद्यानात प्रवेश करणा-या नागरीकांचा हिरमोड होत आहे. याविषयी लोकमतने वंडर्सपार्कमधील गैरसोयीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांनी अधिका-यांची बैठक घेऊन उद्यान पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उद्यानातील ढिसाळ नियोजन आणि देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत आमदार म्हात्रे यांनी महापालिका अधिका-यांना धारेवर धरले. तसेच उद्यानाच्या ओसाड जागेत फुले, फळे, वनऔषधी झाडे लावावीत आणि त्याची माहिती लेखी स्वरूपात लावावी अशा सूचना त्यांनी उद्यान अधिका-यांना केल्या. जेणेकरून मुलांना वनऔषधींची माहिती मिळेल, असे त्यांनी सूचित केले. यावेळी त्यांनी वंडर्स पार्कच्या ओसाड जागेत जेष्ठ नागरीकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उद्यान विभागाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सि.व्ही रेड्डी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.