Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आरे’चे राजकारण पेटले

By admin | Updated: March 10, 2015 00:56 IST

गोरेगावच्या आरे वसाहतीमधील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थानिकांमधून विरोध असतानाच उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम

मुंबई : गोरेगावच्या आरे वसाहतीमधील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थानिकांमधून विरोध असतानाच उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ठाम विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आरेचे राजकारण चांगलेच तापले असून, वाढता विरोध पाहता आता सरकार काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.राम नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आरे कॉलनीतील झाडांची तोड करू नये, अशी मागणी केली आहे. प्रस्तावित मेट्रो तीनच्या कारशेडसाठी येथील शेकडो झाडांची कत्तल करावी लागणार असल्याचे पूर्वीच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र मुंबईचे फुप्फुस असलेल्या आरे कॉलनीतील हिरवळ नष्ट झाल्यास येथील पर्यावरणाचा समतोल ढासळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी एका विशेष समितीची स्थापना केल्याचे सांगितले. मात्र नाईक यांनी आरेमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचे बांधकाम आणि विकासकामे केल्यास त्यास विरोध करणार असल्याचे सांगितले.दरम्यान, मनसेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आरेतील झाडांची तोड होऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. मनसेच्या या पवित्र्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, याआधी स्थानिक रहिवासी आणि मुंबईतील काही स्वयंसेवी संस्थांनाही प्रकल्पाला विरोध करत एकही झाड तोडले जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)