Join us  

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये राजकारणी, अभिनेतेही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 5:11 AM

मुंबईमध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास ई-चलान वाहनमालकाच्या घरी पाठवले जाते. हे चलान त्वरित भरणे आवश्यक आहे. या चलानकडे दुर्लक्ष करणा-यांची यादी मुंबई पोलिसांनी नुकतीच समोर आणली आहे.

मुंबई  - मुंबईमध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास ई-चलान वाहनमालकाच्या घरी पाठवले जाते. हे चलान त्वरित भरणे आवश्यक आहे. या चलानकडे दुर्लक्ष करणाºयांची यादी मुंबई पोलिसांनी नुकतीच समोर आणली आहे. त्यामध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते, मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व सिनेअभिनेता सलमान खानचे कुटुंबीय, कपिल शर्मा व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची नावे असल्याने खळबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे या नेत्यांतर्फे असा प्रकार घडला नसल्याचा, चलान मिळाले नसल्याचा, नेते गाडीत नसताना चालकाने नियमभंग केला असल्याची शक्यता असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या एमएच ०२ सीबी १२३४ या वाहनाद्वारे ७ वेळा नियमभंग झाला आहे. त्यांना एकूण ६ हजार २०० रुपयांचा दंड आहे. कपिल शर्मा यांच्या एमएच ०४ एफझेड ७७० या वाहनावर २ हजार रुपये दंड आहे. राज ठाकरे यांच्या एमएच ४६ जे ९ या वाहनावर फॅन्सी नंबरप्लेट व झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याबाबत १२०० रुपयांचा दंड आहे. अरबाज खान प्रॉडक्शनच्या नावावर असलेल्या वाहनांना चार वेळा नियमभंग केल्याने ४ हजार दंड आहे.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मुलाच्या नावे असलेल्या एमएच ०६ बीई ४४३३ या वाहनाद्वारे वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्याने१ हजार रुपयांचा दंड आहे. भाजपा आमदार राम कदम यांच्या एमएच ०४ एफए ४४४४ या वाहनालादेखील चलान पाठवण्यात आले आहे. मात्र त्यांनी हे वाहन विकल्याचा दावा केला आहे.नो एन्ट्रीमध्ये वाहन चालवणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, सिग्नल न पाळणे अशा विविध प्रकारच्या नियमभंगाबाबत मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांतर्फे मुंबईतील वाहनधारकांकडून ११९ कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत. दरम्यान, कायदे तयार करणाºयांकडून कायदे मोडले जात असतील तर कायदे केवळ सर्वसामान्यांनी पाळण्यासाठी तयार केले जातात का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :वाहतूक कोंडीबातम्या