Join us  

राजकीय फलक उतरले खाली; आचारसंहितेमुळे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 1:44 AM

पाच हजारांहून अधिक बॅनर्स, पोस्टर काढले

मुंबई : आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील नाक्या-नाक्यावर झळकणारे होर्डिंग्स खाली उतरू लागले आहेत. विकास कामांचा गाजावाजा करण्यासाठी लावलेले फलक, बॅनर्स, बोर्ड, पोस्टर्स हटवण्यात येत आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये पाच हजारांहून अधिक राजकीय बॅनर्स, पोस्टर काढण्यात आले आहेत.मुंबईचा चेहरा विद्रुप करणारे हजारो होर्डिंग्स ठिकठिकाणी झळकत असतात. मोठ्या नेत्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा, विकास कामांची जाहिरात बाजी तर कधी दोन राजकीय पक्ष अथवा उमेदवारांमध्ये श्रेयसाठी आरोप-प्रत्यारोप करणारे होर्डिंग्सही झळकत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी मुंबईत होर्डिंग्स लावण्याचे प्रमाण वाढले होते. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याने होर्डिंगच्या माध्यमातून राजकीय पक्षांची फुकटची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात सुरु होती.मात्र रविवारपासून आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे होर्डिंग्स खाली उतरू लागले आहेत. गेल्या चार दिवसांत सुमारे पाच हजारांहून अधिक बॅनर्स व पोस्टसॅवर कारवाई करण्यात आली आहे. फुकटची जाहिरात करण्यासाठी फलक आणि होर्डिंग्सचा आधार राजकीय पक्ष तसेच कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. यासाठी पालिकेची रीतसर परवानगी घेण्याचे अनेकजण टाळतात. कारवाई करण्यास येणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यात येत असे. परंतु, आचारसंहितेमुळे पालिकेला अखेर मुंबई बॅनरमुक्त करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयाचे मनाई आदेश असतानाही एवढे बॅनर लागलेच कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ 

टॅग्स :लोकसभा निवडणूक