Join us  

‘वाडिया’ प्रकरणात राजकीय पक्षांची उडी; सत्ताधारी शिवसेनेवर भाजपा-मनसेचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:48 AM

रुग्णालय वाचवण्यासाठी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. यात मनसेनेही सहभाग घेतला. रुग्णालय बंद होऊ देणार नाही

मुंबई : वाडिया रुग्णालयात एक महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. तसेच नवीन रुग्णांना परत पाठवले जात असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात सोमवारी कर्मचारी संघटनांनी निदर्शन केले. त्याचबरोबर आता या आंदोलनात राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. हे रुग्णालय बंद पाडण्याचे षड्यंत्र शिवसेनेने रचले असल्याचा आरोप करीत भाजपने खळबळ उडवून दिली आहे.

रुग्णालय वाचवण्यासाठी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. यात मनसेनेही सहभाग घेतला. रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असा इशारा शर्मिला ठाकरे यांनी या वेळी दिला. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरित हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.

त्याचवेळी भाजपने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. रुग्णालय बंद करून कोट्यवधींची मोक्याची जागा हडप करण्याचा वाडिया आणि सत्ताधारी शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. आरोपाचे खंडन करीत वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. तर वाडिया रुग्णालय कारभार वाडिया ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जातो. घेतलेल्या सर्व निर्णयांवर बोर्ड आॅफ मॅनेजमेंटची देखरेख असते. त्यानुसारच गेल्या काही वर्षांत निर्णय घेण्यात आले आहेत, असे वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.२१ कोटी थकबाकी...पालिकेकडून बाल रुग्णालयाला १०० टक्के तर प्रसूतिगृहाला ५० टक्के अनुदान दिले जात होते. रुग्णालयाने सादर केलेल्या ताळेबंदानुसार ही रक्कम देण्यात येत होती. मात्र यामध्ये अनियमितता आढळल्यामुळे १० टक्के अनुदान रोखण्यात आले आहे. यामध्ये एकूण २१ कोटींची रक्कम पालिका वाडिया रुग्णालयाला देणार आहे.रुग्णालयातील अनियमिततांबाबत पालिका आणि वाडिया ट्रस्ट यांची निर्णायक बैठक मंगळवारी होणार आहे. डिसेंबर महिन्याचा अनुदानाचा शेवटचा हफ्ता देण्याबाबत तोडगा लवकर काढण्यात येईल. - किशोरी पेडणेकर, महापौर