Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंच्या धरसोडीमुळे राजकीय संभ्रम

By admin | Updated: March 31, 2015 02:14 IST

समविचारी पक्षांना एकत्रित करून रिपब्लिकन बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याची घोषणा करणाऱ्या रिपाइंला (आठवले गट) आता

नवी मुंबई : समविचारी पक्षांना एकत्रित करून रिपब्लिकन बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याची घोषणा करणाऱ्या रिपाइंला (आठवले गट) आता पुन्हा महायुतीचे वेध लागले आहेत. रिपाइंच्या या धरसोड वृत्तीमुळे प्रस्तावित बहुजन आघाडीतील छोटे पक्ष मात्र चांगलेच संभ्रमात सापडले आहेत. रिपाइं हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपा किंवा शिवसेनेसोबत रहावे अशी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका आहे. त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीसाठी दोन्ही पक्षांकडे विचारणा केली. मात्र या दोन्ही पक्षांनी युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असे सांगून रिपाइंने स्वबळाची घोषणा केली. त्यासाठी समविचारी पक्ष व संघटनांची मोट बांधून रिपब्लिकन बहुजन विकास आघाडीची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार शिवसंग्राम, रिपाइं (गवई गट), खोब्रागडे गट, भारिप, रिपब्लिकन सेना, राष्ट्रीय समाज पक्ष आदी पक्षांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या. त्यातून जागावाटपांचे सूत्रही निश्चित करण्यात आले. मात्र त्याच वेळी वरिष्ठ पातळीवरून शिवसेना-भाजपा युतीची बोलणी सुरू झाली. त्यामुळे रिपाइंने विकास आघाडीचा मुद्दा बाजूला ठेवला. युतीची बोलणी सुरू असतानाच राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्यास फायदा होईल, असा एक नवीन विचार पक्षातील एका गटाने मांडला. त्यानुसार राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वांबरोबर चर्चाही सुरू झाल्या. मात्र काहीच निर्णय होत नसल्याने कार्यकर्तेही गोंधळून गेले आहेत.