Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी व तुर्भे गाव येथे पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: September 29, 2014 03:15 IST

एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करून दोन नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पासपोर्ट व व्हिसा संपलेला असतानाही ते भारतात वास्तव्य करत होते

नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करून दोन नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पासपोर्ट व व्हिसा संपलेला असतानाही ते भारतात वास्तव्य करत होते. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ७० संशयितांची कसून चौकशी देखील केली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी रविवारी दोन ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन केले. कोपरी गाव आणि तुर्भे गाव येथील रहिवासी वस्तीमध्ये पोलिसांनी झाडाझडती केली. त्यामध्ये ७० हून अधिक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. या दरम्यान कोपरी गाव येथे पोलिसांना दोन नायजेरियन नागरिक आढळून आले. त्यांचा पासपोर्ट व व्हिसा २०१३ साली संपलेला होता. त्यानंतरही हे दोघे भारतात वास्तव्य करत होते. कोपरी गाव येथे भाड्याच्या घरामध्ये ते गेल्या काही महिन्यांपासून राहत होते. परंतु विदेशी नागरिकांचा भाडोत्री करार करताना घर मालकाने पोलिसांची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे घरमालकावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी सांगितले.पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या सूचनेनुसार उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी परिसरातील नागरिकांना पत्रके देखील वाटली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि एपीएमसी पोलिसांच्या सौजन्याने ही पत्रके छापण्यात आली आहेत. त्यामध्ये दहशतवादी कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यायच्या दक्षतेबद्दल माहिती छापण्यात आली आहे. शिवाय घरफोडी, वाहनचोरी टाळण्यासाठी कशा प्रकारची खबरदारी घ्यायची. सुरक्षा रक्षक अथवा कामगार नेमताना त्यांची पूर्णपणे माहिती घेणे अशा सूचनाही त्यामध्ये करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही पत्रके नागरिकांना उपयुक्त ठरतील असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)