मुंबई : बंकेत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याबरोबरच खर्चासाठी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या बंकाबरोबरच एटीएम बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या गर्दीला आवर घालत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढविलेली दिसून आली. गर्दीचा फायदा घेत, लुटारू आपल्या पैशांवर डल्ला मारू शकतात, म्हणून त्यांना बॅगचोरांपासून सावध राहण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. गुरुवारी सकाळपासूनच खातेदारांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांच्या चितेंत भर पडली होती, तर दुसरीकडे रुग्णालय आणि केमिस्ट दुकानात सुट्ट्या पैशांमुळे सुरू असलेल्या वादाने यात आणखीन भर पडली. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालय, बंक, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी बंदोबस्त वाढविला होता.पोलिसांनी नागरिकांना नोटा बदलण्यासाठी बँकेत जाताना रक्कम जास्त असल्यास भक्कम बॅगेत पैसे व्यवस्थित ठेवावेत, तसेच घरून पैसे घेऊन निघाल्या, नंतर सरळ बँकेत जावे अधे मधे थांबू नये, अशा सूचना केल्या आहेत. या दरम्यान, कोणी सोबत असेल तर जास्त चांगले, तसेच पैशाची बॅग डिकीत सुरक्षित ठेवल्याची खात्री करा. बँकेत कोणी नोटा मोजून देणाऱ्या भामट्यांपासून सावध राहा. नोटा मोजण्याच्या किंवा बदलून देण्याच्या बहाण्याने हे लोक आपली फसवणूक करू शकतात. बँकेतील अधिकृत कर्मचाऱ्यांकडेच काउंटरवर पैसे द्या. आपल्या मदतीसाठी बँकेचे कर्मचारी व पोलीस आहेत. काही अडचण असल्यास त्यांची मदत घ्या, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केले आहेत. (प्रतिनिधी)
बॅँकेतील गर्दीवर पोलिसांचा वॉच
By admin | Updated: November 11, 2016 05:46 IST