Join us  

लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीसांची गस्त वाढवावी - गृहराज्यमंत्री दिपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 6:55 PM

लोकल रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यात येत आहे. रेल्वे फलाटावर तसेच महिलांच्या डब्ब्यात पोलीसांची गस्तही घालण्यात येत असून...

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलीस व रेल्वे पोलीसांनी रेल्वे प्लॅटफॉर्म व डब्यामध्ये पोलीसांची गस्त वाढवावी, तसेच केंद्र शासनाच्या निर्भया निधीतून सुरक्षेसाठी निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना गृह विभागाचे राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी आज येथे दिल्या.

उपनगरीय लोकल रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आमदार निलम गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात आज महिला प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज मंत्रालयात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी आमदार निलम गोऱ्हे, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के. एम. प्रसन्न, पश्चिम रेल्वेचे सहायक सुरक्षा आयुक्त  सी.व्ही. उपाध्ये, अनिल नायर यांच्यासह तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे, सुझान फ्रान्सिस, निकिता जैतपाल, वैशाली वाढे, निलिमा चिमोटे, आशा डिसोझा आदी यावेळी उपस्थित होते.

लोकल रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यात येत आहे. रेल्वे फलाटावर तसेच महिलांच्या डब्ब्यात पोलीसांची गस्तही घालण्यात येत असून निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला डब्ब्यामध्ये लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्याद्वारे अचानक तपासणीही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

केसरकर म्हणाले, गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठी पोलीसांची उपस्थिती महत्त्वाची आहे. पोलीसांची संख्या अपुरी असल्यामुळे होमगार्ड व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची मदत घेण्यात यावी. सुरक्षा बलातील महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. लोहमार्ग पोलीसांनी स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांच्याद्वारे अनुचित प्रकारावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांची दक्षता समिती स्थापन करून आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

महिलांची छेड काढणाऱ्या व विनयभंग करणाऱ्यांवर रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाद्वारे लक्ष ठेवून त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात लोहमार्ग पोलीस व रेल्वे पोलीसांनी समन्वय ठेवावा. लोकलवर दगडफेक होणाऱ्या जागांवर विशेष लक्ष देण्यात येऊन असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी. महिला डब्यात घुसणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध रेल्वे पोलीसांनी कारवाई करावी, अशा सूचनाही केसरकर यांनी यावेळी दिल्या.

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. तसेच हेल्पलाईन सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात. महिला डब्ब्यामधील फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. सुरक्षेसाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात यावी तसेच पोलीस कर्मचारी वाढविण्यात यावेत, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी प्रवासी संघटनेच्या श्रीमती अरगडे यांनीही महिलांच्या समस्या मांडल्या. 

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वे