Join us

शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी घारापुरीत पोलीस बंदोबस्त

By admin | Updated: February 15, 2015 22:44 IST

घारापुरी बेटावर जाणाऱ्या शिवभक्तांना नागरी संरक्षण दल, तटरक्षक दल, सागरी सुरक्षा दलांनी आवश्यक सेवा पुरवून शिवभक्तांचा सागरी प्रवास

उरण : घारापुरी बेटावर जाणाऱ्या शिवभक्तांना नागरी संरक्षण दल, तटरक्षक दल, सागरी सुरक्षा दलांनी आवश्यक सेवा पुरवून शिवभक्तांचा सागरी प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वपोनि ए. एस. पठाण यांनी केले आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर दरवर्षी देशी - विदेशी पर्यटकांसह ७५ हजारांहून अधिक शिवभक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे घारापुरी महाशिवरात्र ही प्रसिध्द आहे. बेटावर शिवभक्त आणि हजारो भाविकांची वाहतूक मच्छीमार ट्रॉलर्समार्फत केली जाते. उरण परिसरातील ठिकठिकाणी असलेल्या अनेक शिवमंदिरांत दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्ताने शिवभक्तांची गर्दी असते. यामध्ये दर्शनासाठी सर्वाधिक गर्दी घारापुरी बेटावर उसळते.सागरी प्रवासामुळे या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर जाणाऱ्या शिवभक्तांचा सागरी प्रवास शांततेत आणि सुखकर व्हावा यासाठी मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वपोनि ए. एस. पठाण यांनी सागरी हद्दीतील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीसाठी घारापुरी सरपंच सुनील पडते, ग्रामपंचायत सदस्य तथा सेनेचे उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ठाकूर, श्याम कोळी, सागरी लाइफ सेव्हिंग दल अध्यक्ष संतोष पाटील, नागरी संरक्षण दल, तटरक्षक दल, सागरी सुरक्षा दलाचे पदाधिकारी, सदस्य आणि ट्रॉलर्स मालकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शिवभक्तांना त्रास होणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सांगतानाच सागरी प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी दक्ष राहण्याचे आवाहनही पठाण यांनी केले. (वार्ताहर)