मुंबई : निवडणुकीच्या काळात कुठल्याही प्रकारे घातपाताची शक्यता घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी म्हणून गुरुवारी मुंबई पोलिसांचे ठिकठिकाणी मार्च झाले. आम्ही आहोत... या पोलिसांच्या भूमिकेमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला.प्रमुख रस्ते, बाजारपेठा, गल्लोगल्ली येथून बाहेर पडणाऱ्या पोलिसांच्या फौजफाट्याने गुरुवारी मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या. मुंबईच्या विविध ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतत्वाखाली पोलीस मार्च काढण्यात आले होते. ठिकठिकाणी पोलीस मार्च काढून नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी पोलीस दलातर्फे जनजागृती करण्यात आली. तसेच यंदाच्या पालिका निवडणुकीत नागरिकांना कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच मार्चद्वारे संचलन करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या मार्चचा उद्देश जनमानसात आपण सुरक्षित आहोत, असा विश्वासाचा संदेश पोहोचविणे तसेच पोलिसांची पूर्वतयारी काय आहे? याची माहिती यातून नागरिकांना देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या आम्ही आहोत! या भावनेमुळे मुंबईकरांनीही त्यांना आदराने सलामी ठोकली. अनेक ठिकाणी या पोलिसांनी लहान मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत संवाद साधला. त्यांना मतदान शांततेत करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला.
निवडणूककाळात पोलिसांचा दिलासा
By admin | Updated: February 17, 2017 02:39 IST