नवी मुंबई : निवृत्ती व पदोन्नतीमुळे चार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती देवून ही पदे भरली जाणार आहेत. मात्र आयुक्तांनी राजीनामा दिल्याने व त्याजागी नवे अधिकारी न आल्यामुळे या ठिकाणची पदोन्नती रखडली आहे.पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आयुक्तालयातून रजेवर असतानाच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा फटका काही पोलीस निरीक्षकांना बसलेला आहे. गेल्या दोन महिन्यांत तीन पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्त झाले आहेत, तर एका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळणार आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या चारही वरिष्ठ निरीक्षकांच्या जागी नवे अधिकारी नेमणे आवश्यक आहे. त्यामध्ये रबाळे, खारघर, नवीन एनआरआय व वाशी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. के. एल. प्रसाद यांच्याच प्रयत्नाने एनआरआयचे नवे पोलीस ठाणे झाले आहे. त्या ठिकाणी देखील अधिकारी नेमणे प्रलंबित आहे. तर ऐरोलीसारखा संवेदनशील भाग असलेले रबाळे पोलीस ठाणे दोन महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्याविनाच चालले आहे. शिवाय वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम पाठारे यांना लवकरच सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील वरिष्ठ निरीक्षकाची नेमणूक होणे आवश्यक आहे. मात्र या नियुक्तीचे अधिकार पोलीस आयुक्तांना आहेत. परंतु के.एल. प्रसाद यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी अद्याप नव्या आयुक्तांची नियुक्ती झालेली नाही. त्यांचा राजीनामा स्वीकारल्याच्या बातम्या येत असल्या तरी आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना लेखी सूचना मिळालेल्या नाहीत. शिवाय राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी १० दिवसांची रजा घेतलेली होती. यामुळे रजा संपताच ते पुन्हा रुजू होतील अशी शक्यताही काही अधिकारी व्यक्त करत आहे.के.एल. प्रसाद यांनी राजीनामा देण्यापूर्वी या नियुक्ती करणे आवश्यक होते. मात्र नाराजीमध्ये त्यांनीही याकडे लक्ष दिले नव्हते. परंतु आयुक्तांच्या गैरहजेरीत हा निर्णय अप्पर आयुक्त विजय चव्हाण हे देखील घेवू शकतात. शिवाय परिमंडळ उपआयुक्त व गुन्हे शाखा उपआयुक्त यांची कमिटी देखील आहे. त्याद्वारे अप्पर आयुक्तांनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही पदोन्नती होणार असलेल्या पोलीस निरीक्षकांना आहे. प्रतिनिधी)वरिष्ठ निरीक्षकांच्या नेमणुका करण्यासाठी आयुक्तांची प्रतीक्षा आहे. खारघर पोलीस ठाण्यात प्रभारी कारभार देण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार उर्वरित पोलीस ठाण्यांसाठी उपआयुक्तांसोबत चर्चा करून प्रभारी अधिकारी नेमले जातील.- विजय चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त
पोलिसांच्या पदोन्नत्या रखडल्या
By admin | Updated: June 6, 2015 22:44 IST