Join us  

'या' अटींवर पत्रकार राहुल कुलकर्णी यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 1:01 AM

राहुल यांना मंगळवारी संध्याकाळी वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चुकीच्या वृत्ताद्वारे अफवा पसरवल्याचा मुख्य आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांचे हे कृत्य वांद्रे येथे परप्रांतीय मजुरांची गर्दी गोळा करण्यास कारणीभूत ठरले का

मुंबई : विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी प्रत्येक विभागातून विशेष गाड्या सोडण्यात येतील, असे चुकीचे वृत्त दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले एबीपी माझा वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांच्या परवानगीने ते उस्मानाबाद येथे परतू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

राहुल यांना मंगळवारी संध्याकाळी वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चुकीच्या वृत्ताद्वारे अफवा पसरवल्याचा मुख्य आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांचे हे कृत्य वांद्रे येथे परप्रांतीय मजुरांची गर्दी गोळा करण्यास कारणीभूत ठरले का, याचाही तपास होणार आहे. गुरुवारी वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. तेव्हा त्यांच्या वतीने बाजू मांडणारे अ‍ॅड. सुबोध देसाई यांनी विरोध केला. कुलकर्णी यांचे वृत्त मंगळवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत प्रसारीत झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर कुलकर्णी यांचे वृत्त वाहिनीवरून प्रसारीत झाले नाही. उलट रेल्वे मंत्रालयाने ३ मेपर्यंत सेवा सुरू करणार नाही, याबाबत घेतलेल्या निर्णयाचे वृत्त वाहिनीवरून प्रसारीत केले गेले. प्रत्यक्षात कुलकर्णी यांच्या वृत्तात कोणत्या स्थानकावरून कोणत्या भागासाठी गाडी सुटणार असा उल्लेखच नव्हता. त्यामुळे त्यांच्या वृत्तामुळे वांद्रे येथे गर्दी झाली, हा निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचे ठरते, असा दावा अ‍ॅड. देसाई यांनी के ला.जेथे ही गर्दी गोळा होती तेथून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुटत नाहीत. उपस्थित गर्दीच्या हाती त्यावेळी सामान नव्हते, हेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, अ‍ॅड. देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने कुलकर्णी यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त केले. त्यांनी तपास कामात सहकार्य करावे. पोलिसांनी परवानगी दिल्यास त्यांना उस्मानाबाद येथे जाता येईल आणि डॉक्टरने प्रमाणपत्र दिल्यास त्यांना दोन आठवडे क्वारंटाइन करण्याचीही आवश्यकता नाही, अशा अटी न्यायालयाने जामीन अर्ज निकाली काढताना घातल्या.

टॅग्स :मुंबईवांद्रे पश्चिमकोरोना वायरस बातम्या