Join us

‘वॉन्टेड’ आरोपींना पोलिसांची ‘क्लीनचिट’

By admin | Updated: December 21, 2015 02:03 IST

कुमार पिल्लई टोळीचा गँगस्टर अनिल रामसेवक पांडे हत्याकांडात पहिल्या चार रिमांड वेळी वॉन्टेड आरोपींसाठी अटकेत असलेल्या नऊ आरोपींच्या कोठडीत वाढ करून घेण्याची धडपड पोलिसांकडून सुरू होती.

मनीषा म्हात्रे, मुंबईकुमार पिल्लई टोळीचा गँगस्टर अनिल रामसेवक पांडे हत्याकांडात पहिल्या चार रिमांड वेळी वॉन्टेड आरोपींसाठी अटकेत असलेल्या नऊ आरोपींच्या कोठडीत वाढ करून घेण्याची धडपड पोलिसांकडून सुरू होती. तथापि, अटकेतील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत होताच, या प्रकरणातील वॉन्टेड आरोपींना क्लीनचीट देऊन पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. क्लीनचीट दिलेल्या दोघा आरोपींच्या जबाबातदेखील तफावत आढळत असल्याने, हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात शिवसेना आमदार सुनील राऊत यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली होती. भांडुप टेंभीपाडा परिसरात पांडेच्या घरात ७ जून २०१५ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घुसलेल्या मारेकऱ्यांनी पांडेची निर्घृण हत्या केली. तेव्हा शेजारी राहणाऱ्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत कळविले. मात्र, नियंत्रण कक्षाचा कॉल येऊनदेखील भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. हत्येच्या दोन तासांनंतर पावणे चारच्या सुमारास भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सौरभ खोपडे, समीर सुरेश चव्हाण, गौतम घाडगे, सागर उर्फ चिंट्या कदम, रवींद्र वानरे, शुभम भोगले, विशाल गौतम पराड, सचिन सुरेश हातपले उर्फ मायकल, विश्वदीप सुभाष नाईक उर्फ हंड्या, गोविंद शिवराम अनुभवणे उर्फ अण्णा, सुभाष गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करून ८ जूनच्या पहिल्या रिमांडसह त्यानंतर १०, ११ आणि १५ जूनच्या रिमांड वेळी सुभाष गुरवसह अण्णाला ‘वॉन्टेड’ आरोपी दाखविण्यात आले होते. अटक केलेल्या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्यानंतर, १६ तारखेला अण्णा पोलीस ठाण्यात हजर झाला, तर १७ तारखेला गुरवचा जबाब नोंदविण्यात आला. सुरुवातीच्या जबाबात दोघांनीही या हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे सांगितले. पोलिसांनी केवळ या जबाबावर या दोघांना सोडून दिले. अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर आॅक्टोबरपासून भांडुप पोलिसांनी नव्याने जबाब नोंदवणे सुरू केले. अण्णा आणि गुरव यांच्या आधी नोंदवलेल्या आणि नव्याने नोंदविलेल्या जबाबामध्येही कमालीची तफावत आढळून येत आहे. माहिती अधिकारातून हे वास्तव प्रिया यांनी समोर आणले आहे. अण्णा याच्या पहिल्या जबाबानुसार, पांडेविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी तोे पोलीस ठाण्यात हजर नव्हता, असे त्याने सांगितले होते, तर १० आॅक्टोबर रोजी नव्याने नोंदवलेल्या जबाबात पांडेविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो होतो, असे सांगितले. शिवाय यावेळी गुरव आणि मयुर शिंदे आपल्यासोबत नसल्याचे अण्णाचे म्हणणे आहे. तथापि, गुरव याच्या म्हणण्यानुसार, पांडेने मंदिराची तोडफोड केल्यामुळे आपणही भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार करतेवेळी हजर असल्याचे सांगितले. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, ८ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास भांडुप पोलीस ठाण्याचे कदम यांच्या बोलवण्यावरून पराड, भोगले, खोपडे आणि मायकल गुरव मुलुंड चेकनाका येथे पोहोचले होते. तेव्हा भांडुप पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. मात्र, आम्हाला सोडून दिल्याचे गुरव याने जबाबात म्हटले आहे. एकीकडे भांडुप पोलीस पहिल्या रिमांडवेळी गुरव याला ‘वॉन्टेड’ आरोपी दाखवतात, तर दुसरीकडे स्वत:च त्याला सोडत आहेत. शिवाय पुढील चार रिमांडवेळी त्याला वॉन्टेड आरोपींच्या यादीत दाखवण्यात आले आहे. आरोपी उपलब्ध असताना त्याला अटक का केली नाही?, ८ ते १५ तारखेपर्यंत दोघेही वॉन्टेड आरोपी पसार का होते? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत. गँगस्टर अनिल पांडे...मयुर शिंदे, अमित भोगले आणि संतोष उर्फ काण्या संत्या याच्यासोबत कुमार पिल्लई गँगसाठी काम करणारा अनिल पांडे हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार होता. कणकवली येथील एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर हल्लाप्रकरणासह, कांजूरमार्ग येथील नगरसेवकावर गोळीबार, हत्या, हत्येचा प्रयत्न, जबर मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद पांडेविरुद्ध आहे.रेकॉर्डमधून उकल शक्यअटक आणि संशयित आरोपींच्या सीडीआर रेकॉर्डने गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रिया पांडे पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. हत्यार लपविलेगुन्ह्यात वापरलेले हत्यार हे मातोश्री मित्रमंडळाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या बंद गाळ््यात शटरच्या पत्र्यामध्ये लपवले होते. हे हत्यार लपवलेला गाळा अण्णा यांच्या मालकीचा आहे. मात्र, तरीदेखील पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप प्रिया पांडे यांनी पोलिसांवर केला आहे.आमदार राऊतांना नोटीसहत्येमागे शिवसेना आमदार सुनील राऊत यांचाही सहभाग असल्याचा आरोप प्रिया यांनी केला आहे. तक्रार अर्जानुसार, पोलिसांनी राऊत यांना दोन वेळा ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस पाठविली. मात्र, राऊत यांनी ‘वरिष्ठांशी बोलणे झाले आहे...’ असे सांगून नोटीस घेण्यास नकार दिला. या प्रकरणी सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.सीसीटीव्हीचे फुटेज नाही...पांडेच्या हत्येचा कट भांडुप पोलीस ठाण्याच्या आवारातच हत्येच्या रात्री केल्याच्या संशयातून पांडे कुटुंबीयांनी सीसीटीव्हीची मागणी केली होती. याबाबत चार वेळा माहिती अधिकाराखाली माहिती मागविण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने फुटेज रेकॉर्ड होत नाहीत, सीसीटीव्हीचे चित्रीकरण होत असून, रेकॉर्डिंग उपलब्ध नाहीत, अशी वेगवेगळी माहिती देण्यात आली.