मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर हडप केलेला बंगला रिकामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सोमवारी चेंबूर येथे घडली. याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत १४ जणांना अटक केली आहे.चेंबूरमध्ये राहणारे सुंदरलाल निरमा यांच्या मालकीचा कलेक्टर कॉलनी परिसरात हा बंगला आहे. २०१०मध्ये भीमसेनेचा अध्यक्ष सांगणा-या आर.आर. पांडियनने हा बंगला भाड्याने घेतला होता. मात्र एक वर्षानंतर या बंगल्यामध्ये या आरोपीने मालकाची परवानगी न घेता भीमसेनेचे कार्यालय सुरू केले. ही बाब निरमा यांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला हा बंगला रिकामा करण्यासाठी सांगितले. मात्र त्याअगोदरच आरोपीने बंगला विकत घेतल्याचे बनावट पेपर तयार करून ठेवले होते. त्याने रोख पैसे दिल्याच्या बनावट पावत्याही तयार केल्या होत्या . अवधी संपल्यानंतरदेखील बंगला रिकामा न झाल्याने त्यांनी आरोपीकडे विचारणा केली असता, त्याने आपण हा बंगला विकत घेतल्याचे बनावट पेपर निरमा यांना दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निरमा यांनी याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीला अटकदेखील केली होती. गेल्या दोन वर्षांपासून हा वाद न्यायालयात सुरू होता. अखेर न्यायालयाने हा बंगला रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी चेंबूर पोलीस बंगल्यावर पोहोचले. पोलिसांनी या आरोपीला बंगला खाली करण्याची विनंती केली. मात्र दोन ते तीन तास उलटल्यानंतरदेखील बंगला रिकामा केला जात नसल्याने पोलिसांनी बंगल्यातील सामान बाहेर काढले. याच दरम्यान आरोपीने काही कार्यकर्त्यांना बोलावून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्याने आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांनी बेगॉन प्राशन करत पोलिसांसमोर आत्महत्येचा प्रयत्नही केला. (प्रतिनिधी)
चेंबूर येथे पोलीस अधिका-यांवर हल्ला
By admin | Updated: January 14, 2015 02:47 IST