भिवंडी : शहरात गायत्रीनगरमध्ये वकील कम्पाउंडच्या खोलीत राहणाऱ्या दाम्पत्यामध्ये नेहमी होणाऱ्या भांडणातून पतीने पत्नीचा गळा घोटण्याची घटना घडली. शांतीनगर पोलिसांनी शहरातून पळून गेलेल्या पतीस मुंबई, भायखळा येथे अटक केली.रूबीना अली हुसेन शेख (२४) असे मृत महिलेचे नाव असून, तिचे अली हुसेन मोह. शकील शेख (२८) याच्याबरोबर लग्न झाले होते. अली हुसेन हा यंत्रमाग कामगार असून, तो नेहमी रूबीनाच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण व मारझोड करीत होता. रूबीनाने शहरातील नवी वस्तीत राहणाऱ्या बहिणीकडून ५ हजार रुपये आणले नाहीत, म्हणून गुरुवारी सायंकाळी अली हुसेनने तिच्याशी भांडण करून तिचा गळा दाबला. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच कडी लावून मुंबईला पळ काढला. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना रूबीना मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी अली हुसेनला भायखळा येथे अटक केली. भिवंडी कोर्टाने त्यास ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)
पत्नीचा खून करणारा पोलीस कोठडीत
By admin | Updated: February 8, 2015 01:51 IST