Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरावावर पोलिसांची नजर

By admin | Updated: August 6, 2015 02:31 IST

दहीहंडीची उंची २० फुटांपेक्षा अधिक नसावी व १८ वर्षांखालील मुलांना उत्सवात सहभागी करू नये, असे निर्बंध घालणारे धोरण राज्य शासनाने अद्याप आखलेले नाही.

मुंबई : दहीहंडीची उंची २० फुटांपेक्षा अधिक नसावी व १८ वर्षांखालील मुलांना उत्सवात सहभागी करू नये, असे निर्बंध घालणारे धोरण राज्य शासनाने अद्याप आखलेले नाही. मात्र तरीही गोविंदांचा सराव मात्र न्यायालयाचे आदेश डावलून सुरू आहे का, यावर पोलीस नजर ठेवून आहेत. या नियमाचे उल्लंघन झाल्यास नेमकी काय कारवाई होणार, हे निश्चित नसले तरी पोलिसांची मात्र उत्सव मंडळांवर नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दहीहंडी उत्सवापूर्वीच सरावादरम्यानही अनेक गोविंदा जखमी झाल्याचे तसेच काहींनी प्राण गमावल्याचे सातत्याने घडत आहे. त्यामुळे हे रोखण्यासाठी या उत्सवाबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन गोविंदा पथकांना करावे लागणार आहे. हे आदेश पथके पाळत आहेत किंवा नाही, यावर सध्या पोलिसांची बारीक नजर आहे. केवळ उत्सवात नव्हे तर सरावादरम्यान गोविंदांनी सुरक्षेकरिता सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. दहीहंडीची उंची आणि वयाच्या निर्देशांसह आयोजक आणि पथकांना सुरक्षाविषयक उपाययोजना अत्यावश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे शहर-उपनगरातील रस्त्यांवर, मैदान तसेच गल्लोगल्ली सुरू असणाऱ्या गोविंदा पथकांच्या सरावांवर पोलिसांचा वॉच असणार आहे. साध्या वेशातील पोलीस ही कामगिरी बजावतील.याविषयी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शहर-उपनगरात सरावांच्या वेळी पोलीस लक्ष ठेवतील, असे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)