विक्रोळी : सकाळच्या सुमारास जॉगिंगसाठी घराबाहेर पडलेले पोलीस शिपाई अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी विक्रोळीत घडली. मंगेश सुधाकर हिरनाईक (३८)असे जखमी पोलीस शिपाईचे नाव असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरनाईक हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सकाळी सातच्या सुमारास विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर जॉगिंग करत असताना त्यांंच्या पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत ते जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी घटनास्थळाहून आरोपी वाहनचालकाने पळ काढल्यामुळे वाहनचालकाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे विक्रोळी पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाहन धडकेत पोलीस जखमी
By admin | Updated: November 21, 2014 01:14 IST